टोलमाफीवर सरकार टप्प्याटप्प्याने निर्णय घेणार
कुडाळ : प्रतिनिधी
कोकणात म्हाडाची घरे उभारण्यासाठी मोठी संधी आहे. विशेषतः कोकणातील प्रमुख पर्यटन केंद्रांच्या ठिकाणी सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे, असे भाजपचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगून लवकरच या भागातील जागांची पाहणी करून म्हाडाच्या गृह प्रकल्पांबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे संकेत त्यांनी दिले.
कुडाळ येथे गुरूवारी आलेल्या आमदार प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. टोल प्रश्नावर बोलताना दरेकर म्हणाले की, सरकार टप्प्याटप्प्याने टोलमाफीचे निर्णय घेत आहे. मुंबईतील टोलमाफी हा त्याचाच भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोलनाक्याच्या निविदेबाबत आणि इतर ठिकाणच्या टोलबाबत जनतेच्या मागण्यांचा विचार करून आर्थिक गणिते जुळवत शासन योग्य तो निर्णय घेईल,असे ते म्हणाले.
टोलच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या माजी आमदार वैभव नाईक यांचा आ.प्रवीण दरेकर यांनी खरपूस समाचार घेतला. वैभव नाईक यांनी जर टीका केली नाही, तर त्यांचे राजकीय अस्तित्व आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होईल. आपले अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांना अधूनमधून असे ‘फुतकारे’ सोडावे लागतात,अशा शब्दांत आ. दरेकर यांनी श्री. नाईकांवर टीकास्त्र सोडले.









