भरदिवसा चोरीच्या घटनेने खळबळ; सीसीटीव्हीत चोरटे कैद
कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव; वेगाने तपास सुरू

कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गालगत राज हॉटेल नजिक असलेल्या कुडाळ शहरातील एका निवासी संकुलातील चार ते पाच फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीतील एका विंगमधील तीन तर दुसऱ्या विंगमधील दोन असे एकूण पाच फ्लॅट चोरट्यांनी फोडले. या चोरीत काही ऐवज लंपास करण्यात आल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
दरम्यान, इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संशयित चोरटे कैद झाले असून, त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.









