“नाईकांचा खरा डोळा टोल निविदेवर”; त्यांचे आंदोलन फक्त दिखावा – आ.राणे
कुडाळ : प्रतिनिधी
ओसरगाव टोलच्या मुद्द्यावरून ओरड मारणाऱ्या उबाठा गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा खरा डोळा टोलच्या निविदेवरच आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी करीत, वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले. आंदोलनाचा दिखावा करून ठेकेदारांना धमकावणे आणि नंतर सेटलमेंट करणे, ही वैभव नाईकांची जुनी कार्यपद्धती असल्याचा घणाघातही यावेळी त्यांनी केला.
कुडाळ येथे गुरूवारी आलेल्या आमदार निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यात येऊन टोलची भेट दिली, या वैभव नाईक यांच्या टीकेचा समाचार घेताना आ.निलेश राणे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येण्यापूर्वीच टोलचे बांधकाम पूर्ण झाले आहे. राजापूर – चिपळूण भागातही ही कामे दीड-दोन वर्षांपूर्वीच झाली आहेत. वस्तुस्थितीची माहिती नसताना केवळ टीकेसाठी टीका करणे हे दिशाभूल करणारे आहे. वैभव नाईक यांची कार्यपद्धती जिल्ह्याला माहीत आहे. आधी आंदोलन करायचे, मग पत्रकार परिषद घेऊन ठेकेदाराला धमकावायचे आणि पडद्यामागे सूत्रे हलवायची,ही त्यांची जुनी स्टाईल आहे. उद्या जर टोल हवा असेल, तर वैभव नाईक स्वतः कॉन्ट्रॅक्टरला भेटून तसे सांगतील, यात नवल वाटायला नको, असा टोलाही आ.निलेश राणे यांनी लगावला.









