ओसरगाव टोलनाक्याजवळ संतप्त नागरिकांचा आक्रमक पवित्रा; कर्नाटकी आंबे महामार्गावर फेकले
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्याला नागरिकांचा दणका; इतर स्टॉलधारकांनी काढता पाय घेतला
कणकवली : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावरील सिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाका नजिक महामार्गालगत स्टाॅल उभारून कर्नाटकातून आणलेला आंबा देवगड हापूस नावाने विक्री केला जात होता. देवगड हापूसचे ब्रॅण्डिंग असलेल्या खोक्यांमध्ये सुरू असलेल्या कर्नाटकी आंब्यांच्या विक्रीचा आज शनिवारी (२३ मे रोजी) सायंकाळी जागरूक नागरिकांसह स्थानिक बागायतदारांनी पर्दाफाश केला. संतप्त नागरिकांनी कर्नाटकी आंबे महामार्गावर ओतून, ग्राहक व पर्यटकांची फसवणूक करणा-या विक्रेत्याला चांगलाच दणका दिला.
देवगड हापूस सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र काही ठिकाणी देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्यांची विक्री होत असल्याचे समोर येत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील ओसरगाव जवळच्या टोलनाका परिसरात महामार्गालगत स्टाॅल लावून आंब्याची विक्री केली जात होती. आज सायंकाळी काही जागरूक नागरिकांनी तेथे धडक देत, आंब्याची पाहणी केली. स्टॉल्सवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आंब्याच्या बॉक्सची तपासणी केली असता, त्यामध्ये कन्नड भाषेतील रद्दी पेपर वापरल्याचे निदर्शनास आले. तसेच सदर बाॅक्समधील आंबा कर्नाटकी आंबा असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होताच, सिंधुदुर्गातील स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत, त्या विक्रेत्याला चांगलाच जाब विचारला. तसेच कर्नाटकी आंबे महामार्गावर फेकून देत त्या विक्रेत्याला चांगलाच धडा शिकवला. याच दरम्यान इतर स्टॉल वरील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवलेले आंबे तात्काळ पॅकिंग बंद करून टेम्पो मध्ये भरत तेथून काढता पाय घेतला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी सध्या विविध समस्यांनी होरपळून निघत असताना आता देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री होत असल्याचा हा गंभीर प्रकार समोर आला आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत अनेक ठिकाणी देवगड हापूस म्हणून परराज्यातील आंबे विकले जात असल्याच्या तक्रारी देवगड आंबा-काजू बागायतदार व्यापारी संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर संघटनेने अचानक धाडसत्र राबवत संबंधित विक्री केंद्रांवर पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी कर्नाटकातून आणलेले आंबे देवगड हापूसच्या नावाने विक्रीस ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार उघडकीस येताच बागायतदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली.
दरम्यान, या प्रकारामुळे खरी ओळख असलेल्या देवगड हापूसच्या बाजारपेठेवर परिणाम होत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, गणेश गावकर, गणेश वाळके, प्रशांत शिंदे, शरद परब, नीरज घाडी, मयूर वाळके, सचिन लोके, तेजस मामघाडी, अजय तेली, स्वप्नील तोडणकर, बंटी गावकर आधी आंबा बागायतदार उपस्थित होते









