ठळक घडामोडी

भडगाव मलाड शाळेचा राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धेत झेंडा!

विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश; विराज लोट देशात ९ वा, जिल्ह्यात प्रथम

गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांचा सन्मान, शिक्षकांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भडगाव मलाड या शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या बुध्दीची चुणूक दाखवत नेत्रदीप यश संपादन केले आहे.
         ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप, गुरुकुल प्रज्ञाशोध, मंथन प्रज्ञाशोध, सिंधुरत्‍न टॅलेंट सर्च या सारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर मानांकन मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामुळे ग्रामीण भागातील शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा एकदा अधोरेखित झाला आहे. ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत कु. विराज लक्ष्मण लोट इ. दुसरी याने १०० पैकी ९९ गुणांसह देशात ९ वी रँक, कु. हंसिका अनंत बावदाणे इ. पहिली १०० पैकी ७४ गुण मिळवले तसेच गुरुकुल स्पर्धा परीक्षेत कु. विराज लक्ष्मण लोट इ. दुसरी १०० पैकी ९४ गुणांसह राज्यात चौथा क्रमांक तसेच मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत कु. विराज लक्ष्मण लोट इ. दुसरी १५० पैकी १४० गुणांसह राज्यात ६वी रँक पटकावली आहे. कु. हंसिका अनंत बावदाणे १५० पैकी ११० गुण व कु. तनिष्का रघुनाथ सावंत १५० पैकी १०४ गुण, कु. सद्विता सागर पालव ५४ गुण संपादन केले आहे. तसेच सिंधुरत्‍न टॅलेंट सर्च परीक्षेत कु. विराज लक्ष्मण लोट याने २०० पैकह १९८ गुणांसह जिल्हयात प्रथम क्रमांक व गोवा सायन्स सेंटर भेटीसाठी निवड व गोल्ड मेडल, कु. पियुष समीर नाईक २०० पैकी १०८ गुणांसह ब्राँझ मेडल, कु. देविका रघुनाथ सावंत ९८ गुण व श्रद्धेश योगेश लोट यांनी ५२ गुण मिळवले आहेत. नुकताच या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा भेट वस्तू देवून त्‍यांच्या यशाचा गुणगौरव करण्यात आला. त्‍यांना शाळेचे मुख्याध्यापक किसन राठोड व उपशिक्षिका स्नेहा सावंत यांचे योग्य नियोजन व मार्गदर्शन लाभले. तसेच केंद्र प्रमुख उत्तम हरमलकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी त्‍यांचे आई वडील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश लोट, उपाध्यक्ष अमृता बावदाणे तसेच स्थानिक प्राधिकरण सदस्य राजेंद्र राणे तसेच सर्व सदस्य, प्रशालातील सर्व पालक आणि भडगाव मलाड ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!