ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग किल्ल्यावर १९ एप्रिल रोजी पारंपारिक शिवजन्मोत्सव सोहळा!

मालवण : प्रतिनिधी
      मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १०. ३० वा. पारंपारिक शिवजन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
      छत्रपती शिवाजी महाराज आरमाराची राजधानी असलेला तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता प्राप्त सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिरात इ.स. १६९५ पासून छत्रपती राजाराम महाराज यांनी शिवजन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली होती. ही परंपरा आजतागायत अखंडपणे ३३१ वर्षे जोपासली जात आहे. हा ऐतिहासिक, वैभवशाली आणि पारंपारिक शिवजन्मोत्सव सोहळा वैशाख शुद्ध द्वितीया, शके १९४८ रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त किल्ल्यात सकाळी १०. ३० वा. मर्दानी खेळ होतील. त्यानंतर लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील आठ तालुक्यातून आलेल्या प्रत्येक एक अशा आठ प्रतिनिधी यांचे सत्कार व भाषणे होतील. सकाळी ११. ३० वा. प्रमुख वक्ते शिवशंभू विचारमंचचे महाराष्ट्र संयोजक सुधीर थोरात यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर घोषवादन, शिवजन्म व शिवआरती होईल. त्यानंतर पारंपारिक शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित रिल्स स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल. तर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
    छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवणात उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर मालवणचे बरेचसे अर्थकारण अवलंबून आहे. किल्ल्यामुळे पर्यटन, हॉटेल व इतर अनेक व्यवसाय निर्माण होऊन येथील लोकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व ओळखून मालवणसह वायरी, तारकर्ली, देवबाग येथील पर्यटन, जलपर्यटन, हॉटेल व होमस्टे व्यावसायिकांनी तसेच तालुक्यातील तमाम शिवप्रेमीनी नागरिक, विद्यार्थी व नवयुवकांनी शिवरायांना मानवंदना देण्यासाठी व शिवजन्मोत्सवाच्या गौरवशाली परंपरेचा वारसा अधिक वृद्धिंगत करण्यासाठी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन पारंपारिक शिवजयंती किल्ले सिंधुदुर्ग समितीतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!