ठळक घडामोडी

कर्ली नदीकाठी महसूलची धडक कारवाई; बेकायदेशीर वाळू रॅम्प जेसीबीने उद्ध्वस्त!

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; कुडाळ तहसीलदार ऑल फिल्ड

कुडाळच्या महसूल पथकाची कारवाई; बेकायदेशीर रॅम्प केले जमीनदोस्त

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीकाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निर्देशानुसार व उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ महसूलच्या पथकाने शनिवारी सायंकाळी मोठी कारवाई केली. यात कर्ली खाडीकिनारील भागात बेकायदा वाळू उपसा करण्यासाठी उभारण्यात आलेले रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईने वाळू व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
        अवैध वाळू उत्खनन व वाहतूक विरोधात जिल्हा प्रशासनाने कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शनिवारी सायंकाळी उशिरा कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी रविकांत तारी, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती मयेकर, नेरकर, सागरे, इंदप, कनवडे, पोलिस पाटील यांच्या पथकाने कर्ली नदी किनाऱ्यावरील अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले. सध्या कर्ली नदीमधील वाळू गटांचे लिलाव प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने, वाळू उपशाला बंदी असूनही कर्ली नदीमध्ये बोटींद्वारे वाळू काढली जात होती. याच अवैध वाळू वाहतुकीसाठी रॅम्प मालकांनी नदीकिनारी विविध ठिकाणी अनधिकृत रॅम्प तयार केले होते. या रॅम्पवर महसूल विभागाच्या पथकाने जेसीबी चालवत, रॅम्प तोडून टाकण्यात आले. दरम्यान, अवैध वाळू उत्खनन व वाहतूकीवरील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहीती प्रशासनाकडून देण्यात आली.

error: Content is protected !!