ठळक घडामोडी

शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे सिंधुदुर्गला फटका; वैभव नाईक यांचा आरोप

पर्यटन व व्यापार धोक्यात; प्रसंगी आंदोलनाचा इशारा

राधानगरी–पत्रादेवी मार्गाऐवजी मुंबई – गोवा महामार्गाला जोडण्याची मागणी

कुडाळ : प्रतिनिधी
       शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणताही फायदा होणार नसून उलट पर्यटन आणि व्यापाराला मोठा फटका बसणार असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. राधानगरी ते पत्रादेवी असा जिल्ह्याबाहेरून जाणारा प्रस्तावित मार्ग बदलून तो फोंडा मार्गे कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गाला जोडावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
      कुडाळ येथे गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक आणि तालुका संघटक बबन बोभाटे उपस्थित होते.
     नाईक यांनी सांगितले की, सध्याच्या आराखड्यानुसार हा महामार्ग राधानगरीहून थेट पत्रादेवी येथे जिल्ह्याबाहेरून जाणार आहे. त्यामुळे गोवा–सिंधुदुर्ग मार्गे येणारे पर्यटक आणि प्रवासी थेट शक्तीपीठ महामार्गाने सातारा मार्गे पुणे-मुंबईकडे वळतील. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनात घट होऊन व्यापारावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कणकवली, कसाल, ओरोस आणि कुडाळ यांसारखी महामार्गावरील महत्त्वाची शहरे या आराखड्यामुळे बाजूला पडतील, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे राधानगरीपर्यंत आलेला महामार्ग फोंडा मार्गे कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गाशी जोडल्यास जिल्ह्याला मोठा आर्थिक फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या मागणीसाठी जिल्ह्यातील पर्यटन आणि व्यावसायिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करताना, गरज पडल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही वैभव नाईक यांनी दिला.

error: Content is protected !!