ठळक घडामोडी

सिंधुदुर्गातील इंधन टंचाई व घाटमार्ग प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा!

कुडाळच्या मनोज वालावलकर यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष

कुडाळ : प्रतिनिधी
       सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईसह घाटमार्गांच्या प्रश्नांबाबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (नवी दिल्ली)चे संचालक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरचे सदस्य मनोज वालावलकर (कुडाळ) यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत विविध समस्या मांडल्या. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंपांवर इंधनाचा तीव्र तुटवडा जाणवत असून, वाहनधारकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. यामुळे वाहतूक, व्यापार, पर्यटन तसेच शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.
       पर्यटन हंगाम सुरू असताना पर्यटकांना इंधनासाठी भटकंती करावी लागत असून, मालवाहतुकीलाही मोठा फटका बसत आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी शेतीकामांची लगबग सुरू असताना ट्रॅक्टर व पॉवर टिलरसाठी कॅन किंवा गॅलनमधून इंधन देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने याबाबत तातडीने योग्य आदेश काढावेत, अशी मागणी वालावलकर यांनी केली.
       यावेळी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख घाटमार्गांची सद्यस्थिती, डागडुजी आणि पर्यायी वाहतूक व्यवस्थेबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात दरडी कोसळणे किंवा रस्ते खचल्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी आगाऊ उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रश्न गांभीर्याने ऐकून घेत, इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी तसेच घाटमार्गांच्या प्रश्नांवर संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक निर्णय करण्यात येईल, असे आश्वासन दिले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या पुढाकारामुळे ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याचे यावेळी श्री.वालावलकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!