ठळक घडामोडी

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कुडाळात ठाकरे शिवसेनेचे जोरदार आंदोलन!

वैभव नाईक हातात सायकल घेऊन उतरले रस्त्यावर; सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल

महागाई, इंधन तुटवडा आणि NEET पेपरफुटीवरून सरकारवर टीका

कुडाळ : जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेनेने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन छेडले.

कुडाळ : प्रतिनिधी
         पेट्रोल – डिझेल दरवाढीविरोधात बुधवारी कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन छेडले. ठाकरे शिवसेना शाखा ते गांधीचौक व परत राजमाता जिजाऊ चौक पर्यंत शिवसैनिकांनी पायी चालत मोर्चा काढून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. वैभव नाईक यांनी हातात सायकल घेऊन पायी चालत इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त केला. एका बाजूला महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार मात्र केवळ आश्वासने देण्यात धन्यता मानत आहे, असा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.
      यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, गंगाराम सडवेलकर, योगेश धुरी, अर्चना बंगे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. या वेळी जोरदार घोषणाबाजी करीत, सरकारचा निषेध व्यक्त केला. इंधन दरवाढ कमी झालीच पाहीजे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली. “सखी सैय्या तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है…” या प्रसिद्ध गाण्याच्या सुरावटी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणांच्या ऑडिओ क्लिप या मोर्चात ठाकरे शिवसेनेने ऐकवत सरकारवर कडाडून टिका केली. पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा, कहा गये अच्छे दिन, पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली.
       यावेळी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर हल्लाबोल  केला. ते म्हणाले, वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा भाव सातत्याने वाढत असून रुपयाचा दर घसरत चालला आहे. पंतप्रधान डॉलरची ही घोडदौड आणि रुपयाची घसरण थांबवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच इंधनासह सर्वच वस्तूंची महागाई वाढली आहे. त्यातच आता पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून सर्वसामान्यांना इंधन मिळणे कठीण झाले आहे.”
      पुढे बोलताना नाईक यांनी आगामी शेती हंगामाबाबत चिंता व्यक्त केली. “शेतकऱ्यांचा हंगाम तोंडावर आला आहे. शेतीसाठी पेट्रोल-डिझेलची अत्यंत गरज भासणार आहे, अशा अवस्थेत इंधनच उपलब्ध नसेल तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. महागाईसोबतच सध्या गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीचा विषयही त्यांनी लावून धरला. या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ व जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले. आमच्या आंदोलनाची ही सुरुवात आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करीतच राहू, परंतू जनतेनेही अशा आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. इंधन दरवाढ रद्द करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे, असे म्हणाले.

error: Content is protected !!