ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

वैद्यकीय बिल मंजुरीसाठी १० हजारांची लाच स्वीकारताना पकडले

सिंधुदुर्ग एसीबीची कारवाई; रूग्णालय परिसरात खळबळ

कुडाळ : प्रतिनिधी
     सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (वय ५६, रा. स्वामी महादेव अपार्टमेंट, तेलीआळी, कणकवली) यांना वैद्यकीय उपचार बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचत कारवाई केली. या कारवाईनंतर जिल्हा रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
    एसीबी कडून मिळालेल्या माहितीनुसार, ४९ वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या वैद्यकीय उपचार बिलाची फाईल मंजुरीसाठी सादर केली होती. मात्र, बिलात त्रुटी असल्याचे सांगत कार्यालयीन अधीक्षक महादेव तेली यांनी काम पूर्ण करून देण्यासाठी बिलाच्या एकूण रकमेच्या ३ टक्के म्हणजे १८ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम १० हजार रुपये निश्चित करण्यात आली. तक्रारदाराने याबाबत कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने ४ मे २०२६ रोजी जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील कार्यालयीन अधीक्षकांच्या कक्षात सापळा रचला. त्यानंतर ठरलेली १० हजार रुपयांची लाच मागणी महादेव तेली यांनी केल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक दिपक माळी व त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता.

error: Content is protected !!