‘अंदर-बाहर’ जुगार खेळताना कारवाई; चार दुचाकींसह २.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
कुडाळ पोलिसांची धडक कारवाई; एक जण ताब्यात,सहा जण फरार
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील माणगाव कट्टागाव येथे माडाच्या बागेत ‘अंदर-बाहर’ नावाच्या जुगारावर कुडाळ पोलिसांनी मंगळवारी (२६ मे) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकत धडक कारवाई केली. याप्रकरणी एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकाला जागीच पोलीसांनी ताब्यात घेतले आहे तर उर्वरित सहा जण पोलिसांची चाहूल लागतात घटनास्थळावरून पळून गेले. या कारवाईत 4 हजार 900 रुपये रोख रक्कमेसह 4 दुचाकी असा सुमारे 2 लाख 29 हजार रू.चा पोलीसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.
कुडाळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव कट्टा गाव येथील खेळण्याच्या मैदानाच्या लगत असलेल्या एका माडाच्या बागेत अंदर बाहर जुगार खेळ खेळला जात असल्याची गोपनीय माहिती कुडाळ पोलिसांना मिळताच पोलिसांनी तेथे अचानकपणे छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी काही जण अंदर बाहेर नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या या कारवाईची चाहूल लागतात काहीजण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र पोलिसांनी एकाला ताब्यात घेण्यात यश मिळवले. यानंतर ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून उर्वरित पळालेल्या संशयितांची नावांची माहिती घेतली. त्यानुसार सातही जणांवर अंदर बहर जुगार साठी पैसे लावून खेळ खेळवित असताना मिळून आल्या प्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चार दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच घटनास्थळी मिळालेले 4900 रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल कुडाळ पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस नितीन राजेंद्र शेडगे यांनी कुडाळ पोलिसात दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आल्याची माहीती कुडाळ पोलिसांकडून देण्यात आली.









