वन्यप्राण्यांचा उच्छाद, महावितरणची अजब बिले, घरकुलचे प्रलंबित प्रस्ताव व खराब रस्त्यांवरूनही सभागृहात चर्चा
सर्व सूचनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे सभापतींचे प्रशासनाला आदेश
कुडाळ : प्रतिनिधी
तेंडोली परिसरात गवे आणि माकडांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने आतापर्यंत ३,५०० माकडांना पकडून अभयारण्यात सोडल्याची माहिती दिली. मात्र, तेंडोली परिसरात वारंवार जेरबंद केलेले बिबटे नेमके कुठे सोडले जातात? असा सवाल पं.स. सदस्य मंगेश प्रभू यांनी कुडाळ पं.स.च्या सभागृहात उपस्थित केला. वनविभाग हे बिबटे दाजीपूरला न सोडता जवळच सोडत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या सभेत वन्य प्राण्यांचा उच्छाद, महावितरणची अजब बिले, प्रलंबित घरकुल प्रस्ताव आणि खराब रस्त्यांच्या प्रश्नावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा सोमवारी पं.स.च्या सभागृहात सभापती मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपसभापती सीताराम तेली, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पंचायत समिती सदस्य व विविध खात्यांचे प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
सदस्य योगेश धुरी यांनी माणगाव दत्त मंदिर ते चर्च या रस्त्याशेजारी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. वारंवार तक्रार करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याकडे योगेश धुरी यांनी लक्ष वेधले. तसेच, माणगाव जि.प.प्राथमिक शाळा क्रमांक २ च्या मोडकळीस आलेल्या इमारतीबाबत तीन वर्षांपासून प्रस्ताव देऊनही निधी मिळत नसल्याने, पावसाळ्यात मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असा सवाल धुरी यांनी विचारला. सभापती श्री. नाईक यांनी यावर संबंधित यंत्रणेला तातडीने भेटी देण्याचे आदेश दिले.
तसेच योगेश धुरी यांनी एका सरकारी कार्यालय संबंधित गायब झालेल्या एका रोलरचा विषय चर्चेत आणला. तालुक्यात एक रोलर भंगारात विकला गेल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तो रोलर नेमका कोणाच्या विभागाचा होता? तो पंचायत समितीचा तर नव्हता ना? असा प्रश्न धुरी यांनी विचारताच उपस्थित अधिकाऱ्यांची सभागृहात चांगलीच भंबेरी उडाली. यावर उत्तर देताना संबंधित अधिकाऱ्याने चार महिन्यांपूर्वी तो रोलर तिथे उभा होता असे सांगत, अधिक माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले. तर सदस्य बाळकृष्ण मडव यांनी कुडाळ तालुक्यातील जांभवडे येथील एका ग्राहकाच्या घरी महावितरणने अद्याप वीज मीटर बसवलेला नाही, तरीही त्यांना २ हजार रुपयांचे बिल आलेच कसे? असा सवाल सभागृहात उपस्थित केला. महावितरणच्या या अनागोंदी कारभारावर सभागृहात जोरदार चर्चा झाली.
सदस्या अर्चना बंगे यांनी वालावल-हुमरमळा येथील २७ लाभार्थी घरकुलापासून वंचित असल्याचा प्रश्न सभागृहात मांडला, तर हिर्लोक येथील घरदुरुस्तीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे का आले नाहीत, अशी विचारणा अश्विनी सावंत यांनी केली. विस्तार अधिकारी संजय ओरोसकर यांनी तालुक्यात नवीन ४,५०० घरकुलांची यादी मंजूर होणार असल्याचे स्पष्ट केले. पीएम किसान योजनेसाठी २०१०-११ पूर्वीचे आधार कार्ड अनिवार्य असल्याच्या जाचक अटीमुळे शेतकरी अडचणीत असल्याचे बाळकृष्ण मडव यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर तालुका कृषी अधाकारी श्री. चौगले यांनी जुन्या आधार कार्डाची अट शिथिल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.
कुंदे-आंब्रड गावात कुडाळ डेपोची बस येत नसल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत असल्याबाबत सदस्य नितीन म्हाडेश्वर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.ओरोस येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कॉम्प्लेक्सचे सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याकडे अमित भोगले यांनी लक्ष वेधले. या सभेला काही खातेप्रमुख अनुपस्थित राहिल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सभापती श्री. नाईक यांनी सर्व प्रलंबित प्रश्नांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी संबंधित यंत्रणांना दिले.
दरम्यान या सभेत वन्य प्राण्यांकडून होणा-या नुकसानीचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. यावेळी वन्य प्राण्यांच्या नुकसानीवरून उपसभापती सीताराम तेली यांनी ‘आमची जनावरे वनात गेली तर गुन्हे दाखल होतात, मग ही राष्ट्रीय संपत्ती आमच्या शेतात घुसल्यावर आम्ही काय करायचे?’ असा संतप्त सवाल वनविभागाला विचारला.







