रासायनिक खतांना पर्याय! जीवाणू संवर्धनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण
‘गोकृपा अमृतम’मुळे जमिनीची सुपीकता वाढणार; कृषी विभागाचा उपक्रम

कुडाळ : प्रतिनिधी
रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व शाश्वत शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने, तालुक्यातील आवळेगाव येथे कृषि विभागाच्या वतीने शेतकर्यांसाठी ‘गोकृपा अमृतम’ या जीवाणू संवर्धनाचे प्रात्यक्षिक दाखवून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा कृषि विभाग आणि तालुका कृषी अधिकारी (कुडाळ) श्री. भास्कर चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी श्रीम. प्रिया खरवडे तसेच agricart farmers producer company सचिव श्री. सचिन चोरगे यांच्या माध्यमातून तसेच गावचे प्रथम नागरिक सरपंच श्रीम. पूर्वा सावंत, उपसरपंच श्री. विवेक कुपेरकर, आणि सर्व प्रगतशील शेतकरी यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला. जमिनीचे आरोग्य आणि जीवाणूंचे महत्त्व कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना कृषि अधिकार्यांनी सांगितले की, सततच्या रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. यावर उत्तम उपाय म्हणजे देशी गायीच्या पंचगव्यापासून तयार केलेले ‘गोकृपा अमृतम’ कल्चर. यामध्ये सुमारे ४० पेक्षा जास्त प्रकारचे उपयुक्त मित्र जीवाणू असतात, जे जमिनीची सुपीकता कमालीची वाढवतात. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. रासायनिक खतांवरील होणारा अवाजवी खर्च वाचवून उत्पादन खर्च कमी करतात, थेट प्रात्यक्षिकातून सोपी पद्धत सादर करण्यात आले.
यावेळी शेतकर्यांसमोर प्रत्यक्ष द्रावण तयार करण्याची कृती करून दाखवण्यात आली. २०० लिटर पाण्यात १ लिटर गोकृपा अमृतम जीवाणू कल्चर, २ किलो सेंद्रिय गूळ आणि २ लिटर ताजे गोमूत्र/शेण कालवून हे द्रावण ५ ते ७ दिवसांत कसे तयार होते, याचे साधे गणित शेतकर्यांना समजावून सांगण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी यांच्या विशेष सूचनेनुसार, आवेळेगाव व परिसरातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी या सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा आणि आपल्या शेतीचे आरोग्य सुधारावे, असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकार्यांनी यावेळी केले. या मार्गदर्शनाला गावातील प्रगतशील शेतकरी आणि महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.









