१५-२० फूट उंचीवरून प्रेक्षक मैदानात कोसळले; पाच ते सहा जणांना दुखापत
मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)
मालवण शहरातील मध्यरात्री चालू असलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यावेळी अचानकपणे प्रेक्षक गॅलरी कोसळल्याची घटना घडली.या घटनेमुळे खळबळ उडाली. यात पाच ते सहा जण जखमी झाले.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, सुमारे पंधरा ते वीस फूट उंचीची प्रेक्षक गॅलरी सामना सुरू असतानाच कोसळल्याने काही प्रेक्षक थेट मैदानावर कोसळले. प्रेक्षक एकमेकांवर कोसळल्याने अनेकांना बाहेर पडणे मुश्किल झाले होते. या दुर्घटनेत काहींना गंभीर तर काहींना किरकोळ दुखापती झाली. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते.घटनेची माहिती मिळताच नगरसेवक सुदेश आचरेकर, मत्स्य उदयोजक सतीश आचरेकर, योगेश आचरेकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमी युवकांची विचारपूस केली.रुग्णालयात परिसरात एकच गर्दी झाली होती. दुर्घटना घडल्यानंतर स्पर्धा थांबविण्यात आली होती.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सदरची अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा कालचा अंतिम दिवस होता. या अंतिम दिवशी मुंबई महिला संघांनाही खास निमंत्रित करण्यात आले होते. यामुळे प्रेक्षकांची तुफान गर्दी मैदानाच्या भोवताली झाली होती. आणि सामना सुरू असतानाच पुरुषांची गॅलरी अचानकपणे कोसळली. यामुळे एकच खळबळ उडाली आणि अनेकांना दुखापत झाली आहे. या घटनेची नोंद पोलीसात नव्हती. रात्री तातडीने कोसळलेली गॅलरीही हटविण्यात आली होती.









