आरोग्य सेवा ‘व्हेंटिलेटर’वर, कंत्राटी चालकांची पिळवणूक
अधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात आयुक्तांकडे दाद मागणार – पावसकर
कुडाळ : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेची १५ तारखेला झालेली सर्वसाधारण सभा पूर्णतः भ्रष्टाचाराने माखलेली असल्याचे उघड झाले आहे. प्रशासकीय अधिकारी सुस्तावलेले असून एकाच खात्यात अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे गरजेचे आहे. लोकशाहीचा गळा आवळून सभा गुंडाळणाऱ्या प्रशासनाविरोधात आता थेट आयुक्तांकडे दाद मागणार, असा इशारा विरोधी गटाचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी दिला आहे.
कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे शिवसेनेचे जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी त्यांनी आरोग्य, शिक्षण, बांधकाम आणि जलजीवन मिशनमधील गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकला. या पत्रकार परिषदेला ठाकरे शिवसेनेचे जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर, संजय गावडे आणि विजय नाईक उपस्थित होते.
आरोग्य विभाग आणि ‘डीन’ यांचा मनमानी कारभार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वस्त्रधुलाई कर्मचाऱ्यांना ८-९ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. तिथले ‘डीन’ लोहंगे मनमानी कारभार करत असून रुग्णालयात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. कुडाळची आरोग्य सेवा स्वतःच ‘व्हेंटिलेटर’वर असून, तिथे डॉक्टर आणि सुविधांचा अभाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे शवविच्छेदनासाठी कटर सुद्धा उपलब्ध नाही; त्यासाठी पोलिसांना किंवा वारसांना पैसे मोजावे लागतात, असा आरोप पावसकर यांनी केला.
वाहनाचालकांची आर्थिक पिळवणूक
आरोग्य विभागातील कंत्राटी वाहनचालकांकडून १० हजार रुपयांचे कोरे धनादेश आगाऊ घेतले जात आहेत. नोव्हेंबर २०२४ पासून त्यांचा पीएफ जमा नसतानाही ठेकेदारांची बिले मंजूर कशी झाली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
इतर विभागांतील भ्रष्टाचाराचे वाभाडे
शिक्षण व पोषण आहार: २५० शाळांवर मोठा खर्च केला, मात्र तिथे पटसंख्या नाही. पोषण आहारात मुले न खाणारे पदार्थ सक्तीने दिले जात असल्याने माल पडून राहत आहे.सिंधु सरस मध्ये पहिल्या दिवशी बचत गटांच्या महिलांसाठी फॅन सुद्धा नव्हते, ही जिल्ह्यासाठी शरमेची बाब आहे.जलजीवन मिशन मध्ये ‘हर घर नल’ आले पण त्यात पाणीच नाही. ठेकेदारांचे ४५० कोटी रुपये थकले आहेत.सार्वजनिक बांधकाम मध्ये कुडाळ बांधकाम विभागात रंगाच्या कामांच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा कळस झाला असून विनाकारण बिले काढली जात आहेत.झाराप महामार्गावरील ओव्हरब्रिजच्या कामात निकृष्ट माती वापरली जात असल्याने पूल खचण्याची भीती आहे.
सभागृहाची अवस्था दयनीय; सदस्यांची मुस्कटदाबी !
जिल्हा परिषदेच्या सभेत ५० पैकी केवळ ५-७ सदस्यांनाच बोलू दिले गेले. अध्यक्षांनी आणि ‘सीईओ’नी लोकशाहीचा अपमान करत सभा गुंडाळली. अधिकाऱ्यांचे दालन एसीमध्ये आहेत, मात्र सभागृहात सदस्यांसाठी पंखे, व्हेंटिलेशन किंवा माईकची साधी सोय नव्हती. ५० सदस्यांचे माईक बंद ठेवून प्रशासनाने स्वतःची मनमानी चालवली आहे. यापुढे ही दडपशाही सहन करणार नाही, असा इशारा रुपेश पावसकर यांनी दिला.









