ठळक घडामोडी

कुडाळ न.पं.च्या सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोला पुन्हा आग!

महिन्याभरातील दुसरी घटना; प्रशासनाची धावपळ

दोन अग्नीशमन दलाच्या गाड्यांमार्फत आग आटोक्यात

कुडाळ : प्रतिनिधी
          कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला बुधवारी दुपारी पुन्हा आग लागली. भर दुपारच्या वेळेस वा-याचा वेग जास्त असल्याने क्षणार्धात आग अधिक भडकल्याने परिसरात धुराची मोठी समस्या निर्माण झाली. दोन अग्नीशमन दलाच्या गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सायंकाळपर्यंत सुरू होते. वीस दिवसांपूर्वीही अशाचप्रकारे या कचरा डेपोला अचानक आग लागली होती.
         कुडाळ शहरातील घंटा गाड्यांमार्फत गोळा केला जाणारा सांगिर्डेवाडी येथील जागेत टाकला जातो. या कचरा डेपोला गेल्याच महिन्यात १५ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली होती. जवळपास दोन दिवस आग धुमसत होते. दोन अग्नीशमन बंब तसेच पाण्याचा टँकरच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर बुधवारी दुपारी पुन्हा या कचरा डेपोला अचानक आग लागली. आग लागल्याची माहीती मिळताच नगरपंचायत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्नीशमन बंब पाचारण करण्यात आले. नगरपंचायत आणि एमआयडीसीच्या अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी पाचारण करून, आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. दरम्यान महिन्याभरात दोन वेळा कचरा डेपोला आग लागल्याने आगीमागे संशय व्यक्त केला जात असून, आग लागते की लावली जाते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

error: Content is protected !!