
कणकवली : प्रतिनिधी
बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कणकवली शहरात आज मंगळवारी अनुयायांच्या वतीने भव्य आणि उत्स्फूर्त रॅली काढण्यात आली. डीजेच्या तालावर आंबेडकरांच्या जीवनप्रवासावर आधारित गीतांनी आणि घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. त्यामुळे मंगळवारी कणकवलीत सर्वत्र ‘भीममय’ वातावरण निर्माण झाले होते.
सिद्धार्थनगर येथून सकाळी बौद्ध समाजातील अबालवृद्धांनी मोठ्या उत्साहात रॅलीला सुरुवात केली. तथागत गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या फुलांनी सजवलेल्या प्रतिमांनी रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. महिलांचीही लक्षणीय उपस्थिती यावेळी दिसून आली.
ही रॅली सिद्धार्थनगर येथून सुरू होऊन पटकीदेवी, ढालकाठी, तेलीआळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बुद्धविहार, आप्पासाहेब पटवर्धन चौक मार्गे पुन्हा सिद्धार्थनगर येथे विसर्जित झाली. रॅलीतील सहभागी नागरिकांनी धम्म व अशोकचक्र असलेले झेंडे हातात घेत मानवतेचा आणि समतेचा संदेश दिला. या रॅलीत युवा युतीनी देखील जल्लोष करत या मध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
विशेष म्हणजे मंगळवारी आठवडा बाजार असूनही व्यापारी व ग्राहकांनी रॅलीला सहकार्य करत रस्ते मोकळे करून दिले. पवन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस प्रशासन व समता दलाच्या सैनिकांनी रॅलीचे उत्कृष्ट नियोजन केले.त्यामुळे ही रॅली शिस्तबद्ध आणि लक्षवेधी ठरली.









