ठळक घडामोडी

सिंधुदुर्गात प्रथमच जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन उत्साहात!

डिजिटल युगात पतसंस्थांसाठी प्रशिक्षण महत्त्वाचे –  मनिष दळवी

आंबोली : प्रतिनिधी
      सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सैनिक स्कूल आंबोली येथे सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन २०२६’ चे उद्घाटन शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते पार पडले.
     पतसंस्था हे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. गुणात्मक दृष्ट्या सहकार क्षेत्र आपल्या कोकणात मोठं आहे. सहकाराला रूप द्यायचे असेल तर प्रशिक्षणाची मोठी गरज आहे. यात ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांचा आणि कर्ज घेणाऱ्या कर्जदारांचा बघण्याचा दृष्टीकोण मोठा आहे. पतसंस्था ह्या सर्वासाठी पोहोचण्याचे एक मोठं माध्यम आहे. डिजीटल बँकिंग क्षेत्रात पतसंस्थांची गुणवत्ता टीकवायची असेल तर प्रशिक्षण महत्वाचे आहे. आपल्या पतसंस्थाची प्रगती करत असताना त्यासाठीचा पाया महत्वाचा आहे हे लक्षात ठेवावे. पी. एफ, डॉन्ट्स यांनी लावलेलं सहकाराचं रोपटं आता मोठे झाल्याचं अल्लेख त्यांनी केला आणि सुनिल राऊळ यांनी या रोपट्याची चांगल्या प्रकारे जपणूक करून आता ते मोठे झाल्याचा अल्लेख त्यांनी केला. तसेच या फेडरेशनच्या माध्यमातून सर्वानी मिळून एकत्र सेवा देण्याचा प्रयत्न करूया असे ते म्हणाले. तसेच भविष्यात अशा अधिवेशनाला जिल्हा बँकेकडून सदैव सहकार्य राहील असे आश्वासन त्यांनी दिले तसेच या अधिवेशनाला मोठ्या भावाच्या भूमिकेतून जिल्हा बँके कडून एक लाख रूपये मदत देण्याचे घोषित केले. आणि जिल्हा बँकेकडून विना मोबदला सहकार्य करु असे सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी याप्रसंगी म्हणाले.
     सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारचे अधिवेशन प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. सहकाराच्या माध्यमातून सर्वांची सेवा करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. या शिबिरात विविध विषयांचे ज्ञान संपादन करणे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे आहे. सहकार चळवळ अशीच पुढे सुरू ठेवायची असेल, तर संस्थांनी ‘आदर्श उपविधी’ स्वीकारणे गरजेचे आहे. सध्या पतसंस्थांना कर्ज वसुलीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि आगामी काळातील ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर या संदर्भातही या अधिवेशनात मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, या चळवळीत अहोरात्र काम करून सर्वसामान्यांची सेवा करणाऱ्या आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांचा या अधिवेशनात विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     कोकण विभागाचे अध्यक्ष गिरीश तुळपुले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बदल आणि उपविधी हाच सहकाराचा मुख्य पाया आहे. आज महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांकडे जवळजवळ ९५ हजार कोटी रुपयांचा एवढा मोठा निधी उपलब्ध आहे. ऐतिहासिक संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, सन १८०० मध्ये पहिली पतसंस्था कवठेकर यांनी स्थापन केली होती, ज्याचे भागभांडवल अवघे सव्वा दोन रुपये होते. आपल्या भाषणात त्यांनी ‘पिग्मी कमिशन’ संदर्भातील विविध मुद्द्द्यांवरही प्रकाश टाकला. याप्रसंगी सुदर्शन भालेराव, शांतीलाल शिंगणे आणि श्री. लांबर यांनीही आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
     दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात सहकाराचा ध्वज फडकवून आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सहकार क्षेत्रावर आधारित एक गीत सादर करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार संचालक जॉय डान्टस् यांनी मानले.
    या अधिवेशनाच्या व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, आंबोलीच्या सरपंच सावित्री पालेकर, महाराष्ट्र फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगणे, पतसंस्था फेडरेशनच्चे अध्यक्ष सुदर्शन भालेराव, कोकण विभागाचे अध्यक्ष गिरीश तुळपुले, जिल्हा निबंधक सोपान शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, मायकल डिसोजा,  गुरुनाथ पेडणेकर, महेश कुंभार, जॉय डान्टस्, बाबुराव कविटकर, रमेश बोंद्रे, नंदकिशोर कोरगावकर, सुनील नाईक, समीर वंजारी, विष्णू पराडकर, सुभाष चौधरी, पांडुरंग काकतकर, शिक्षक लांबर, बी. आर. यादव, आणि राजन तेली आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!