आंब्रड परबवाडीत आरोग्य शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि भजन सामन्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
सामाजिक कार्यकर्ते जीजी परब यांचा गौरव; खेळ पैठणीचा स्पर्धेत अस्मिता सावंत विजेत्या

कुडाळ : प्रतिनिधी
माणसाने जीवनात मोठी स्वप्न पाहिली, अपार कष्ठ करुन त्या स्वप्नांचा पाठलाग केला, प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले तर जीवनात यशस्वी होणे सोपे आहेच परंतु सर्व मान सन्मान तुमच्या पर्यंत चालत येतील असे प्रेरणादायी विचार पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी व्यक्त केले. यावेळी पहिली ते पदवीधर अशा ७० गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले. तर खेळ पैठणीचा स्पर्धेत अस्मिता सावंत पैठणीच्या मानकरी ठरल्या.
श्री गांगेश्वर प्रासादिक मंडळ आंब्रड परबवाडी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते गोपाळ कृष्णा उर्फ जीजी परब यांनी गेली चाळीस वर्ष केलेल्या समाज कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना सन्मानपत्र, कल्पवृक्ष, शाल श्रीफळ देऊन सपत्नीक पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हभप विश्वनाथ गवंडळकर महाराज, सरपंच मानसी कदम, माजी सैनिक आनंद सावंत, मुबंई मंडळाचे अध्यक्ष बाबा सावंत, सचिव संजीव परब, स्थानिक अध्यक्ष प्रकाश परब, सचिव भालचंद्र घाडीगावकर, खजिनदार सचिन परब, आबा परब गावकर,निवृत्त पोलीस अधिकारी अशोक मसूरकर, प्राध्यापक दिनेश राणे, कार्याध्यक्ष भास्कर परब, माजी सैनिक मंगेश परब, उपाध्यक्ष गजानन परब,आंब्रड हायस्कूलचे सचिव पांडुरंग दळवी, प्रा. विवेकानंद गगांवणे, माजी सरपंच संदीप परब आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रति वर्षी श्री गांगेश्वर प्रासादिक मंडळ आंब्रड परबवाडीच्या वतीने विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येतात. मंडळाच्या मालकी हक्काचे सांस्कृतिक भवन उभारून त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली आणि या सर्व उपक्रमात जीजी परब यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते गेली चाळीस वर्ष योगदान देत आहेत हे गौरवास्पद आहे असे गौरवोद्गार हभप विश्वनाथ गवंडळकर यांनी यावेळी व्यक्त केले. प्रा. विवेकानंद गगांवणे यांनीही यावेळी आपले समयोचित विचार मांडले. यावेळी मंडळाचे मुंबई सचिव संजीव परब यांनी सन्मान पत्राचे वाचन तसेच सूत्रसंचालन संदीप परब यांनी केले.
तसेच प्रतिवर्षीप्रमाणे श्री गांगेश्वर प्रासादिक मंडळाच्या वतीने वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली. यनिमित्त यावर्षी स्वामी समर्थ ट्रस्ट खोटले व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, जिल्हा आरोग्य विभाग यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. डॉ. कोलते, अस्तिरोग तज्ञ डॉ. सर्वेश तायशेट्ये यांच्यासह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक डॉक्टर्स उपस्थित होते. या शिवाय खेळ पैठणीचा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झाला. या कर्यक्रमाचे सूत्रसंचलन मालवणी फेम बादल चौधरी यांनी केले. या मध्ये अस्मिता सावंत प्रथम तर सविता परब या दुसऱ्या बक्षीसाच्या मानकरी ठरल्या. पहिली ते पदवीधर, दहावीचे प्रथम क्रमांक अशा ७० विद्यार्थ्यांना भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले. रात्री सिद्ध भराडी बाल दशावतार नाट्य मंडळाचा श्री गणेश महिमा हा नाट्य प्रयोग तर दुसऱ्या दिवशी भजनरत्न प्रकाश पारकर बुवा आणि संगीत रत्न भालचंद्र केळूसकर बुवा यांच्या डबल बारीचा भजन सामना संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने भजन रसिक उपस्थित होते.









