अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
आ. निलेश राणेंच्या नेतृत्वात कुडाळचा कारभार गतिमान – सभापती मिलिंद नाईक
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या मासिक सभेवरून सोशल मीडियावर ‘अधिकारी गैरहजर, सभापती हतबल’ अशा आशयाची बातमी जोरदार व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर आज कुडाळ पंचायत समितीच्या सभापती दालनात तातडीने पत्रकार परिषद घेत सभापतीं मिलिंद नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मासिक सभेमध्ये सभापती म्हणून मी किंवा सभागृहातील कोणीही ‘हतबल’ हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पसरलेली ती बातमी पूर्णपणे दिशाभूल करणारी आणि चुकीची आहे, असा ठाम दावा सभापतींनी केला आहे.
अनुपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ नोटीस
पत्रकार परिषदेत बोलताना सभापती म्हणाले की, कालच्या सभेला एक-दोन खात्यांचे प्रमुख अनुपस्थित होते आणि त्यांनी आपले प्रतिनिधी पाठवले होते. या प्रतिनिधींना सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नीट देता आली नाहीत. ही बाब गांभीर्याने घेत, मी सभेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले होते की, पुढच्या प्रत्येक सभेला खातेप्रमुखांनी स्वतः हजर राहिलेच पाहिजे.जे अधिकारी काल अनुपस्थित होते, त्यांना त्याच ठिकाणी मी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते आणि काल संध्याकाळपर्यंत या नोटिसा त्यांना पाठवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना फोन!
सभेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धीरज पिसाळ हे वारंवार अनुपस्थित राहत असल्यामुळे, सभा चालू असतानाच मी सावंतवाडीच्या सा. बा. च्या कार्यकारी अभियंता इंगवले मॅडम यांना थेट फोन लावला. पंचायत समितीची सभा हे तालुक्याचे सर्वोच्च सभागृह आहे, तुमच्या उपअभियंत्यांच्या अनुपस्थितीबाबत त्यांना कडक सूचना द्या,असे त्यांना बजावले. त्यावर इंगवले मॅडम यांनी त्वरित दखल घेत लेखी पत्र काढण्याचे आणि पुढच्या सभेला उपअभियंता हजर राहतील, असे आश्वासन दिल्याचे सभापतींनी सांगितले.
राणेंचा पाठिंबा असताना आम्ही हतबल कसे होऊ?
सोशल मीडियावरील बातमीचा समाचार घेताना सभापती म्हणाले, आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात आम्ही कुडाळ तालुक्याचा प्रशासकीय कारभार गतिमान पद्धतीने चालवण्यासाठी कटिबद्ध आहोत. आ.राणे साहेब नेहमीच सांगतात की, जे अधिकारी ऐकणार नाहीत किंवा टाळाटाळ करतील, त्यांना माझ्याकडे घेऊन या, मी त्यांचे कान उघडी करतो. एवढा मोठा पाठिंबा आणि विश्वास पाठीशी असताना, कुडाळ तालुक्यात अधिकाऱ्यांसमोर हतबल होण्याची नामुष्की आमच्यावर कधीच येणार नाही.
विरोधी सदस्यांनी जेव्हा विचारले की ‘तुमचे सरकार आहे, तुमचे आमदार आहेत, मग अधिकारी का येत नाहीत?, तेव्हा मी उलट त्यांनाच विचारले होते की ‘तुमच्या मते काय करायचे ते तुम्हीच सांगा’. हा प्रश्न मी हतबलतेतून विचारला नव्हता, तर विरोधी सदस्यांना या विषयाची किती माहिती आहे, हे पाहण्यासाठी विचारला होता, असा खुलासाही त्यांनी केला.
दोन दिवसांत खातेप्रमुखांची बैठक
सभेत सदस्यांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांची अतिशय चांगल्या वातावरणात उत्तरे देण्यात आली असून, संपूर्ण सभा सुरळीत पार पडली. येत्या दोन ते तीन दिवसांत तालुक्यातील सर्व खातेप्रमुखांची एक आढावा बैठक घेतली जाणार असून, त्यांना सभेला उपस्थित राहण्याबाबत सक्त सूचना दिल्या जातील. या संदर्भात आमदार निलेश राणे यांच्याशीही बोलणे झाले असून, ते स्वतः देखील सर्व अधिकाऱ्यांना पंचायत समितीच्या सभेला उपस्थित राहणे बंधनकारक असल्याच्या कडक सूचना देणार आहेत, अशी माहिती सभापतींनी शेवटी दिली.









