ठळक घडामोडी

पिग्मी एजंटांनी घेतली आमदार निलेश राणेंची भेट!

कमिशन पूर्ववत करण्याची पिग्मी एजंटांची मागणी

मालवण : आमदार निलेश राणे यांच्याशी चर्चा करताना पिग्मी एजंट. (छायाचित्र : महेश कदम)

मालवण : प्रतिनिधी
     पिग्मी एजंट यांना मिळणाऱ्या 3 टक्के कमिशनमध्ये कपात करून 2.50 टक्के करण्याच्या सहकार खात्याच्या आदेशामुळे हवालदिल झालेल्या पिग्मी एजंट यांनी मालवण येथे शिवसेना आमदार निलेश राणे यांची नुकतीच भेट घेतली. पिग्मी एजंटांचे कमिशन पूर्ववत करावे अशी मागणी करणारे निवेदन आमदार निलेश राणे यांना दिले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, मालवण उपनगराध्यक्ष दिपक पाटकर उपस्थित होते.
     राज्याच्या सहकार खात्याकडून राज्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये पिग्मी संकलन करणाऱ्या पिग्मी एजंटांना कमाल 2.50 टक्के कमिशन देण्याच्या आदेशामुळे हवालदिल झालेल्या पिग्मी एजंट यांनी मालवण येथे आमदार निलेश राणे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पिग्मी एजंट ऊन, पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीत ठेवीदारांच्या व्यवसायाच्या ठिकाणी, निवासस्थानी जाऊन पिग्मी स्वरूपात ठेवी गोळा करतात. पिग्मी एजंट ज्या पतसंस्थेसाठी पिग्मी संकलन करीत आहेत त्या संस्थेला एक आपलेच कुटुंब मानून सध्याच्या महागाईच्या काळातसुद्धा पूर्वीचे 3 टक्के कमिशन पुरेसे नसतानाही यामध्ये वाढ करण्याची मागणी कधीही केली नाही. सध्या इंधनाचे वाढत असलेले दर आणि महागाईच्या काळात या कमी केलेल्या  तुटपुंज्या पिग्मी कमिशन मध्ये काम करणे अशक्य होणार आहे. खर्च आणि मिळकत यामध्ये ताळमेळ बसणे कठीण झाले आहे. त्यामुळे पूर्ववत पिग्मी कमिशनसाठी आपण पाठपुरावा करावा या मागणीसाठी आमदार निलेश राणे यांना निवेदन सादर केले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी हा संपूर्ण राज्याच्या अखत्यारीत येणारा विषय असून याबाबत योग्य ती माहिती घेऊन संबंधीत खात्याशी चर्चा करून आपल्याला निश्चितच न्याय मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

error: Content is protected !!