पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर; ज्यादा वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरात सध्या पर्यटनाचा हंगाम आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी, प्रलंबित सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाढत्या चोऱ्यांच्या शक्यतेबाबत आज मंगळवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :१. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवा:मे महिन्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढली असून कुडाळ शहरातील बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना बसत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी शहरात अतिरिक्त ट्राफिक पोलीस तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२. सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ बसवा:शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी शहरात तात्काळ सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
३. रात्रीची गस्त (पेट्रोलिंग) वाढवा:उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक सहलीसाठी किंवा गावी गेल्याने शहरात अनेक घरे बंद आहेत. ही संधी साधून चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेच्या रक्षणासाठी कुडाळ पोलिसांनी शहरातील पेट्रोलिंगमध्ये वाढ करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या मागण्यांची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी दिला आहे.
सदर निवेदन पी.एस.आय. अनिरुद्ध सावर्डे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, शहर निरिक्षक सुशील चिंदरकर, अमित राणे, गुरु गडकर, धिरेंद्र चव्हाण व संतोष अडूरकर उपस्थित होते.









