मोठा अनर्थ टळला; टेम्पो ट्रॅव्हलरमधील प्रवासी बालंबाल बचावले
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ – सावंतवाडी मार्गावरील आकेरी – उंचवळा परिसरात चालत्या टेम्पो ट्रॅव्हलरवर रस्त्यालगतचे धोकादायक स्थितीत असलेले आकेशियाचे मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत वाहन चालकासह अन्य एक जण जखमी झाला असून, वाहनातील इतर १७ प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंगुळी गुढीपूर येथील कुटुंबीय टेम्पो ट्रॅव्हलरने अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते. आकेरी येथील उंचवळा परिसरातून वाहन जात असताना रस्त्यालगत धोकादायक स्थितीत उभे असलेले आकेशियाचे मोठे झाड वा-यामुळे अचानक वाहनाच्या दर्शनी भागावर कोसळले. या अपघातात चालकासह अन्य एकाला दुखापत झाली. घटनास्थळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी चालकाला वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच कटरच्या सहाय्याने गाडीवर पडलेले झाड बाजूला करण्यात आले.
दरम्यान, संबंधित झाड काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत अर्धवट जळाले होते. धोकादायक स्थितीत असतानाही ते हटविण्यात आले नव्हते. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली.









