ठळक घडामोडी

बुधवळे मळेशेत येथे विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद!

वनविभागाकडून बचाव कार्य; तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात सोडले

मालवण : प्रतिनिधी
      वनविभागाच्या परिमंडळ मालवण,नियतक्षेत्र कांदळगाव मधील मौजे बुधवळे मळेशेत मधील एका विहिरीमध्ये रात्री वन्यप्राणी बिबट पडल्याची माहिती रविवारी 3 मे रोजी स्थानिक ग्रामस्थ श्री.राजु मुणगेकर व श्री. संदिप बुधवळेकर यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सदर घटनेची पाहणी केली. वनविभागचे अधिकारी, जलद बचाव पथक व ग्रामस्थ यांनी सुरक्षित रित्या सदर विहिरीत पडलेल्या बिबटला सुरक्षित रित्या पिंजऱ्यात जेरबंद केले. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सदर बिबट ची तपासणी करण्यात आली असून सदर बिबट सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
           वन्यप्राणी बिबट हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असून त्याचे संरक्षण करणे सर्वांचे कर्तव्य आहे. वन्यप्राणी बिबट हा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार संरक्षित असून सदर प्राण्याची शिकार करणे, शिकारीचा प्रयत्न करणे हे गंभीर गुन्हे असून गुन्हेगारास द्रव्यदंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते. अशाप्रकारच्या घटना निदर्शनास आलेस तात्काळ वनविभागाशी संपर्क करण्यात यावा असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे .
       सदरचे बचाव कार्य मिलीश दत्त शर्मा, उपवनसंरक्षक सावंतवाडी व डॉ.सुनील लाड सहा. वनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाख़ाली वनक्षेत्रपाल कुडाळ श्री.संदीप कुंभार, वनपाल मालवण सदानंद परब, वनरक्षक धामापूर अतुल खोत, वाहन चालक राहुल मयेकर, RRT टीम सदस्य अनिल गावडे,दिवाकर बांबरर्डेकर,सुशांत करंगुटकर,वैभव अमरुस्कर,प्रसाद गावडे, श्री. संदिप परब स्थानिक ग्रामस्थ श्री. राजू मुणगेकर, श्री अनंत शिर्सेकर, श्री.संदिप बुधवळेकर, श्री.समीर टेंबुलकर, श्री.प्रकाश बिडवलेकर, श्री संदिप कुळेकर पोलीस पाटील व बुधवळे ग्रामस्थ यांच्या सहभागातुन यशस्वी रित्या पुर्ण करण्यात आले आहे. वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांचे
आभार मानले आहेत.

error: Content is protected !!