महसूल विभागाच्या विविध कामांसाठी एकाच ठिकाणी सुविधा; तहसील कार्यालयात विशेष शिबिर
नागरिकांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे तहसिलदार सचिन पाटील यांचे आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय, कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)” अंतर्गत कुडाळ नगरपंचायत व कुडाळ महसूली मंडळ स्तरावर शुक्रवार दि. 8 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता तहसिलदार कार्यालय, कुडाळ येथे महसूल शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती तहसिलदार सचिन पाटील यांनी दिली.
कुडाळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांसाठी महसूल विभागातील महत्वाच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी देण्यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकीची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (एनए) परवानगी, अकृषिक तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा, ‘सनद” प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे (संजय गांधी योजना योजना) लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यासाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायदा उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पटटे वाटप व ई- मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी, पीएम किसान नोंदणी, वर्ग 2 चे वर्ग 1 करण्याबाबतची प्रकरणे, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड वरील नाव कमी-जास्त करणे तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्याची कामे करण्यात येणार आहेत. याचबरोबर संबंधित सेवा विषयक अर्जही स्विकारण्यात येणार आहेत. तालुक्यातील कुडाळ मंडळातंर्गत गावातील नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या शिबिराला आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून महसूल विभागाच्या सेवांचा लाभघ्यावा असे आवाहन तहसिलदार सचिन पाटील यांनी केले आहे.









