शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रश्नांबाबत वेधले लक्ष
कुडाळ : प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध समस्यांबाबत नेरूर देऊळवाडा येथील जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. डवंगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. रुग्णालयातील अडचणी तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींचे संथगतीने सुरू असलेले काम याबाबत त्यांनी जाब विचारला. तसेच रुग्णांच्या समस्यांबाबत अनेक उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आल्याची माहीती श्री.पावसकर यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात अनेक समस्या नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यासंदर्भात श्री.पावसकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दवंगे यांची भेट घेण्याचे निश्चित करून भेट घेतली. यावेळी त्यांनी अधिष्ठाता व उपस्थित डाॅक्टरांशी चर्चा केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. डवंगे यांनी सांगितले की, काही तांत्रिक अडचणी आहेत. विशेषतः सिमेंटच्या पुरवठ्यात अडथळे येत होते; मात्र सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील यंत्रणेच्या माध्यमातून पुरवठा सुरळीत करण्यात आला असून कामाला गती देण्यात येत आहे. रुग्णालयात एमआरआय मशीन उपलब्ध नसल्याची बाब पावसकर यांनी निदर्शनास आणून दिली. यावर नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर एमआरआय सेवा कार्यान्वित केली जाईल, असे अधिष्ठात्यांनी स्पष्ट केले. तसेच रुग्णालय परिसरात गेल्या दोन दिवसांपासून भेडसावत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत तातडीने उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
धुलाई कर्मचाऱ्यांचे वेतन सप्टेंबरपासून थकीत असल्याचा मुद्दाही यावेळी श्री.पावसकर यांनी उपस्थित केला. यासंदर्भात ट्रेझरी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे अधिष्ठात्यांनी नमूद केले. दरम्यान, रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट (क्ष-किरण तज्ज्ञ) आणि न्यूरोसर्जन (मज्जासंस्था शस्त्रक्रियातज्ज्ञ) या महत्त्वाच्या दोन्ही विभागांत प्राध्यापक उपलब्ध नसल्याची खंत पावसकर यांनी व्यक्त केली. आवश्यकतेनुसार मागणी करूनही संबंधित तज्ज्ञांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवले जात असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. या सर्व प्रश्नांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून रुग्णालयातील सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रुपेश पावसकर यांनी यावेळी दिले.







