वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्यापक दुरुस्ती
पावसाळ्यात बिघाड टाळण्यासाठी मोहीम
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
पावसाळ्यामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा, याकरीता मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार, मार्गदर्शक सूचनेनुसार पावसाळयात वीज पुरवठ्यातील बिघाड कमीतकमी होईल या दृष्टीने नियोजन करून मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणा देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आलेली आहेत. महावितरणकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राधान्यक्रमानुसार वीज वाहिन्यांची व वीज उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत, अशी माहीती महावितरणकडून देण्यात आली.
त्यात उपरी वीजवाहिन्यांना स्पर्श करत असतील त्या फांद्या तोडणे, तुटलेले पिन आणि डिस्क इन्सुलेटर बदलणे, स्टे वायरमध्ये स्टे इन्सुलेटर तपासणे व दुरुस्त करणे, वाहिन्यांचे जळालेले वा खराब झालेले जंपर बदली करणे, वाकलेले वा गंजलेले पोल बदली करणे, उंचीबाबतचे निकष न अनुसरलेल्या सैल झालेल्या तारा ओढणे, लघुदाब वाहिनीवर पीव्हीसी स्पेसर्स बसविणे, उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांना गार्डिंग पुरविणे, रस्त्यालगतच्या व रस्ता क्रॉस करणाऱ्या वाहिन्यांच्या गार्डींगची तपासणी करणे व त्याचा योग्य तो ताण ठेवणे, उच्चदाब व लघुदाब खांबाचे पुर्ण अर्थिंग तपासणे तसेच आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे, वितरण रोहित्रांचे पुर्ण अर्थिंग तपासणे आणि तुटलेल्या अर्थवायर पुर्ववत करणे, रोहित्र वितरण पेटींची जळालेली केबल बदली करणे, रोहित्र वितरण पेटीस आर्थिंग करणे, रोहित्राच्या तेलाची गळतीची तपासणी करणे, रोहित्राच्या ब्रीदरमधील सिलीका जेल बदली करणे.
रोहित्र व वाहिन्यांचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, लघुदाब वितरण पेटीची किरकोळ दुरुस्ती करणे व दरवाजा नसल्यास लावणे, भूमीगत वीज वाहिन्यांचे तात्पुरते असलेले जॉइंट कायमस्वरुपी करणे, उच्चदाब व लघुदाब फीडर पीलरचे पुर्ण अर्थिंग तपासणे तसेच आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे, जळालेल्या वा तुटलेल्या सर्व्हिस वायर बदली करणे.
नादुरुस्त उच्चदाब वाहिनी दुरुस्त व बदली करणे, निकामी वा तुटलेले वीज खांब बदली करणे, उपकेंद्रांची अर्थिंग तपासणी करणे, उपकेंद्रांमधील वाढलेले गवत काढणे व स्वच्छता करणे, उपकेंद्रांतील लाइटिंग अरेस्टरची तपासणी करणे व नादुरुस्त असल्यास नवीन लावणे.उपकेंद्रांतील बॅटरींची स्थिती तपासणी करणे व मेंटेनन्स करणे, उपकेंद्रातील आयसोलेटर अलाइनमेंट तपासणे व दुरुस्त करणे, पीलरचे अर्थिंग तपासणे व दुरुस्ती करणे, जळालेल्या वा तुटलेल्या केबल बदली वा दुरुस्ती करणे, परिस्थितीनुसार आवश्यक असलेली इतर कामे सर्व वाहिन्यांचे तसेच उपकेंद्रांचे, रोहित्रांचे मान्सूनपूर्व देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात आलेली आहेत.
आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व सामुग्री आणि उपकरणांचा साठा जसे की, रोहित्र ऑईल, वीज खांब, इन्सुलेटर इ. उपलब्ध ठेवण्यात आला आहे. पावसाळयामध्ये वीज पुरवठा सुरळीत सुरु राहण्याकरीता क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दक्ष राहणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 7875765019 हा असून नागरिक व वीजग्राहक आपातकालीन स्थितीत या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देऊ शकतात. शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे 1912 वा 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या 24 तास सेवेत असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशी माहीती महावितरणकडून देण्यात आली.
मान्सूनपुर्व कामांचा आढावा!
3317 वीज वाहिन्यांच्या गाळ्यातील वीज तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्या. 283 वीज वाहिन्या गाळ्यातील सैल वीजतारा ओढल्या. 261 वीजवाहिन्यांच्या गाळ्यांना गार्डींग बसविले. 6 कि.मी. अंतराच्या जीर्ण वीजतारा बदलल्या. 106 वाकलेले तसेच गंजलेले वीज खांब बदलले. 1195 पीव्हीसी स्पेसर्स लघुदाब वीज वाहिनीत बसविले. 212 ठिकाणी जंपर बदलले. 74 पिन, 57 डिस्क व 57 स्टे इन्सुलेटर बदलले. 69 खराब रोहित्र पेट्या बदलल्या. 76 रोहित्र वितरण पेट्यांची स्वच्छता दुरुस्ती अशी कामे पूर्ण करण्यात आल्याची माहीती महावितरणकडून देण्यात आली.






