कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करणाऱ्या एका कार्यक्षम अधिकाऱ्याची अशा प्रकारे अचानक बदली झाल्याने कुडाळ तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राजेंद्र मगदूम यांनी ५ जुलै २०२४ रोजी कुडाळ पोलिस स्थानकाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी आता अपर्यंत १० हून अधिक गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली. एटीएम फोडी, गांजा तस्करी आणि खून प्रकरणांत त्यांनी थेट कारवाई करून आरोपींना तुरुंगाची हवा दाखवली होती. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे तालुक्यातील गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आले होते. एक कार्यक्षम अधिकारी असूनही श्री. मगदूम यांची बदली झाल्याने राजकीय चर्चाना पेव फुटले आहे. प्रशासनाने मात्र याला ‘नियमित बदली’चे स्वरूप दिले असून त्यांची नियुक्ती आता सागरी सुरक्षा विभागात केली आहे. श्री. मगदूम यांच्या बदलीनंतर कुडाळ पोलिस ठाण्याचा अति. प्रभारी कार्यभार सहा. पोलिस निरीक्षक जयदीप पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आता कुडाळ पोलिस निरीक्षकपदी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.









