ठळक घडामोडी

गटारे व सांडपाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करा!

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या प्रशासनाला सूचना

गटारात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; मान्सूनपूर्व कामांना गती

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ शहरातील तुंबलेली गटारे आणि सांडपाणी समस्येची नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी गंभीर दखल घेत, आज त्यांनी स्थानिक नगरसेवक व प्रशासनाच्या अधिका-यांसह शहरातील विविध भागांतील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी गटार साफसफाईसह तातडीने विविध उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी प्रशासनाला दिल्या.
      न.पं. मार्फत शहरात गटार सफाई मोहिम सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष बांदेकर-शिरवलकर यांनी आज शुक्रवारी सकाळी पानबाजार, मच्छीमार्केटसह अन्य भागातील गटारांची प्रत्यक्ष पाहणी करीत आढावा घेतला. नादुरुस्त गटारे, सांडपाणी साचण्याच्या समस्या यावर तातडीने काम करून पावसाळ्यापूर्वी योग्य निचरा व्यवस्था सुनिश्चित करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच गटारांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर तसेच सांडपाणी थेट गटारात सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. स्वच्छता केल्यानंतर पुन्हा गटारे तुंबणार नाहीत यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
      याशिवाय, मान्सूनपूर्व नालेसफाई मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी यावेळी दिली. प्रशासनाने कोणतीही हयगय न करता ही कामे वेळेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी नगरसेविका नयना मांजरेकर, स्वच्छता निरीक्षक श्री.नाटेकर आदींसह न.पं. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!