कुडाळ तालुक्याच्या एका गावातील प्रकार; गुढ वाढले
वनविभागाने अवशेष ताब्यात घेत तपास सुरू; अहवालानंतरच सत्य स्पष्ट होणार
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील कडावल रेंज अंतर्गत येणाऱ्या अणाव गावात जंगला नजिक जमिनीत पुरलेल्या अवस्थेत एक मृत प्राणी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर प्राणी हा जंगलातील ‘गवारेडा’ आहे की कोणाचा ‘पाळीव रेडा’, याबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला असून आहे. हा प्राणी पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असला तरी, त्याच्या शिंगांवरून तो ‘गवारेडा’ असावा, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत गूढ वाढले असून वनविभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील तिठ्यापासून अगदी जवळच असलेल्या सदर गावात हा मृत प्राणी जमिनीत पुरलेल्या स्थितीत सापडला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कुजलेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण जात आहे. मात्र, प्राथमिक पाहणीत तो गवारेडा असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, तो प्राणी जमिनीत पुरलेला आढळल्याने ‘शिकारीचा’ संशय बळावला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्थानिक पातळीवर बंदूक परवाना असणाऱ्यांच्या नावांची यादी तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समजते. दरम्यान या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. वनविभागाने या प्राण्याचे अवशेष आपल्या ताब्यात घेतले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतरच हा नेमका प्राणी कोणता आणि मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पंचनाम्यानंतर मृत प्राण्याचे अवशेष नियमानुसार दहन करण्यात आले. वनविभागाचे पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.









