ठळक घडामोडी

कुडाळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी!

न.पं.कडून ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा शुभारंभ; ३ हजार उद्देशिका वाटपाचा संकल्प

संविधान मूल्यांचा अंगीकार करा – नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
       भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव आज मंगळवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने भारताच्या संविधान उद्देशिकेच्या प्रत वाटप शुभारंभ करण्यात आला.
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती सर्वत्र उत्साहाने आणि वैचारिक कार्यक्रमाने संपन्न झाली. कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला स्थानिक नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी सभापती मिलिंद नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते व काका कुडाळकर, नगरसेवक विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, अॅड.राजीव कुडाळकर, निलेश परब, उदय मांजरेकर, गणेश भोगटे, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, ज्योती जळवी, माजी नगरसेविका सरोज जाधव, नगरपंचायतीचे अधिकारी राजू पठाण आदी उपस्थित होते.
    कुडाळ नगरपंचायतीमार्फत हर घर संविधान कार्यक्रमांतर्गत संविधान उद्देशिका प्रत शहरातील प्रत्येक घरांना दिली जाणार आहे. या उद्देशिका प्रत वाटप शुभारंभावेळी करण्यात आला तसेच यावेळी शिवसेना, भाजप, उबाठा शिवसेना, शासकीय अधिकारी यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, बंड्या सावंत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, रोहित भोगटे तसेच स्थानिक नागरिकांमध्ये मंडळाचे माजी अध्यक्ष विजयकुमार जाधव, लक्ष्मण कुडाळकर, माजी सचिव राजेश कुडाळकर, रजनीकांत कदम, नितेश कुडाळकर, आनंद पेंडुरकर, जनार्दन कुडाळकर, निलेश कुडाळकर, दाजी कुडाळकर, अभय जाधव आदी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कुडाळ नगरपंचायतीने मंडप व्यवस्था तसेच सुशोभीकरण केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतीचे आभार मानले.
     संविधान मुल्यांचे पालन करण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन!
‘घर घर संविधान’ या उपक्रमाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ नगरपंचायतीतर्फे भारतीय संविधानाची उद्देशिका नागरिकांना वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण ३,००० उद्देशिका फ्रेमचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. ‘घर घर संविधान’ या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये संविधानाबद्दल अधिक जाणिवा निर्माण होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!