ठळक घडामोडी

अणावमध्ये त्या प्रकरणाने खळबळ; तीन शेतकरी वनविभागाच्या रडारवर!

पुरावे शोधण्यासाठी वनविभागाची दोन किलोमीटर पायपीट

बंदूक परवानाधारकांची माहिती संकलित; शिकारीच्या संशयाने तपास वेगात

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ तालुक्यातील अणाव येथील जंगल परिसरात जमिनीत पुरलेल्या अवस्थेत मृत प्राणी आढळल्याने वनविभाग सतर्क झाला असून, हा प्रकार शिकारीचा असावा असा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी वनविभागाने परिसरातील तीन संशयित शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्याने खळबळ उडाली आहे.
    ही घटना सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडल्याचा अंदाज असून, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे घटनास्थळावरील अनेक पुरावे नष्ट झाले आहेत. तरीही मृत प्राण्याला जमिनीत गाडण्यात आल्याने शिकारीच्या संशयाला बळ मिळत आहे. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळापासून सुमारे दोन किलोमीटर परिसराची पाहणी करून पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला.
    तपासाचा रोख आता स्थानिक शेतकऱ्यांकडे वळवण्यात आला असून, नोटीस बजावलेल्या तिन्ही शेतकऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. दुसरीकडे, पोलिसांनी परिसरातील बंदूक परवाना धारकांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. सावंतवाडी उपवनसंरक्षक मिलेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कडावल वनविभागाचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

error: Content is protected !!