देशव्यापी आंदोलनाला कुडाळ तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन औषध सेवा मात्र सुरू
कुडाळ : प्रतिनिधी
ऑनलाईन औषधविक्रीसह बनावट औषधांविरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनात कुडाळ तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तालुक्यातील सुमारे 130 ते 140 मेडिकल स्टोअर्स कडकडीत बंद ठेवण्यात आले.
विविध मागण्यांबाबत पुकारलेल्या या देशव्यापी आंदोलनात कुडाळ तालुका डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनने सहभाग घेतला. कुडाळ शहर व तालुक्यातील जवळपास 130 हून अधिक मेडिकल स्टोअर्स कडकडीत बंद ठेवत व्यावसायिकांनी या देशव्यापी आंदोलनात सहभाग दर्शवला. तालुक्यात या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरी व ग्रामीण भागातील सर्वच मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्यात आले होते. मात्र आंदोलनामुळे गंभीर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आपत्कालीन व रूग्णालयातील इमर्जन्सी औषध सेवा सुरू होती माहीती तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन कडून देण्यात आली.









