ठळक घडामोडी

भरउन्हात घरावर पडला ५ किलोचा बर्फाचा तुकडा!

देवलीत खळबळ : ना पाऊस ना गारा; जणू आश्चर्यच

मालवण : प्रतिनिधी
       मालवण तालुक्यातील देवली गावातील खालची परबवाडी येथील विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी अचानकपणे सुमारे पाच किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडल्याने खळबळ उडाली आहे. बर्फाचा तुकडा घरावर पडताना घरच्या छप्पराची कौले तुटली आणि एक लाकडी रिपही तुटली होती. काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारांचा पाऊस पडला असताना सध्या पावसाची कोणतीही स्थिती नसताना अचानकपणे घरावर बर्फाचा तुकडा पडल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
      शुक्रवारी दुपारी सौ. अर्चना विजय देऊलकर या घरात असताना स्वयंपाकघरात मोठा आवाज झाल्याने त्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता एक मोठा बर्फाचा तुकडा स्वयंपाकघरात कोसळलेला दिसून आला. घराच्या छप्पराची काही कौले व रिप तुटून हा बर्फाचा तुकडा घरात कोसळला होता. देऊलकर यांचे घर गावाच्या मध्यभागी असे आहे. यामुळे त्यांच्या घरावरून रस्ता गेला अगर घळण असेल असा कोणताही प्रकार नसतानाही अचानकपणे त्यांच्या घराच्या छप्परवर बर्फाचा तुकडा पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ढगाळ वातावरण किंवा कोणतेही पावसाचे चिन्ह नसताना भरउन्हात ही भलीमोठी गाररुपी बर्फाचा तुकडा पडल्याने देवली गावात खळबळ उडाली असून नक्की हा बर्फ आला कुठून याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
      दरम्यान, देऊलकर यांनी संशोधनासाठी हा बर्फाचा तुकडा फ्रीजमध्ये ठेवला असून हा बर्फ गाराच्या स्वरूपात आहे की अन्य काही याचा उलगडा होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
    दरम्यान, देवली गावचे सरपंच शाम वाक्कर यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी जात देऊलकर कुटुंबियांशी चर्चा केली. तसेच याबाबत प्रशासनाला माहिती देऊन घटनेच्या शास्त्रीय कारणांचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!