ठळक घडामोडी

लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात!

पंचक्रोशी जामसंडेचा दमदार विजय; लक्ष्मीनारायण वालावल संघ उपविजेता

स्थानिक संघांची चुरस; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : प्रतिनिधी
     सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि लाजरी क्रिकेट ग्रुप, कुडाळ यांच्या वतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा कुडाळ येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. जिल्हाभरातील नामांकित संघांनी सहभाग नोंदवत स्पर्धेला चुरशीची रंगत आणली.
     या स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला रु. २५,००० रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. श्री लक्ष्मीनारायण वालावल संघाने द्वितीय क्रमांक मिळवत रु. १५,००० बक्षीस व चषक मिळवला. तृतीय क्रमांक यंगस्टार कणकवली (रु. ५,००० व चषक) तर चतुर्थ क्रमांक पंचक्रोशी फोंडा (रु. ५,००० व चषक) संघाने मिळवला.
     स्पर्धेत वैयक्तिक कामगिरीबद्दलही खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट चढाईचा मान निखिल चव्हाण (श्री लक्ष्मीनारायण वालावल) यांना मिळाला. उत्कृष्ट पकडीसाठी श्रीराम भडसाळे (पंचक्रोशी जामसंडे) यांचा गौरव करण्यात आला. तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून सुशील पाटकर (पंचक्रोशी जामसंडे) यांनी मान पटकावला. या स्पर्धेमुळे स्थानिक कबड्डी खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळाली असून, प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयोजक लाजरी क्रिकेट ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!