उद्योगमंत्री उदय सामंत यांची निधीला मंजूरी, आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश
रुंदीकरण, कॉक्रिटीकरणामुळे वाहतूक सुलभ; एमआयडीसी ते विमानतळ थेट कॉरिडोर तयारणार
कुडाळ : प्रतिनिधी
मालवण-कुडाळ मतदारसंघातील औद्योगिक विकासाला गती देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार समारंभात दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. आमदार निलेश राणे यांच्या आग्रही पुढाकारातून कुडाळ एमआयडीसी परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरण व बळकटीकरणासाठी तब्बल २७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी म्हणजे कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले मोठे यश मानले जात आहे. कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी या महत्त्वपूर्ण मंजुरीबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
कुडाळ औद्योगिक वसाहतीतील वाढत्या उद्योगधंद्यांच्या गरजा लक्षात घेऊन एमआयडीसी जंक्शन ते पिंगुळी म्हापसेकर तिठा, तसेच एमआयडीसी जंक्शन ते नवीन एमआयडीसी मार्गे पाट जंक्शन, आणि अंतर्गत दोन प्रमुख मार्ग अशा सुमारे ७.५ किमी लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण, कॉक्रिटीकरण व बळकटीकरण करण्यात येणार आहे. यापूर्वी असोसिएशनच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय महामार्ग ते एमआयडीसी जंक्शन या मार्गाचे दुपदरीकरण व मजबुतीकरण सुमारे १८ कोटी रुपयांत पूर्ण झाले होते. आता या नव्या टप्प्यामुळे संपूर्ण औद्योगिक परिसरासाठी दर्जेदार व अखंड रस्ते जाळे उभे राहणार आहे.
या कामासाठी आमदार निलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा करत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे विशेष लक्ष वेधले होते. उद्योगमंत्र्यांनीही याची दखल घेत, संबंधित विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रत्यक्षात उतरवले. या प्रकल्पामुळे कुडाळ एमआयडीसीमधील उद्योगांना मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यात येणाऱ्या नव्या उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा सक्षम होतील. विशेषतः पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
तसेच, हा रस्ता विकसित झाल्यामुळे एमआयडीसी ते विमानतळ असा थेट आणि सुलभ कॉरिडोर तयार होणार असून, याचा फायदा उद्योगांसोबतच पर्यटन क्षेत्रालाही होणार आहे. महामार्ग ते विमानतळ असा प्रवास अधिक जलद व सोयीस्कर होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकूण विकासाला चालना मिळणार आहे. यासोबतच, कुडाळ औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राच्या मागणीचाही पाठपुरावा सुरू असून, त्यालाही लवकरच मंजुरी मिळण्याचे सकारात्मक संकेत मिळत आहेत. एकूणच, या निर्णयामुळे कुडाळ एमआयडीसीचा औद्योगिक नकाशावर अधिक भक्कम ठसा उमटणार असून, रोजगारनिर्मिती व स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे, असा विश्वास एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी व्यक्त केला आहे.









