ठळक घडामोडी

महसूल अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी कुडाळ दौऱ्यात घेतला प्रांत, तहसीलदार कार्यालयाचा आढावा!

पर्यावरण दिनी वृक्षारोपणातून दिला संवर्धनाचा संदेश; नागरिकाभिमुख सेवांवर भर

ई-ऑफिस, ७/१२ दुरुस्ती व eQJ Court प्रणालीचा घेतला आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

कुडाळ : प्रतिनिधी
     जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज शुक्रवारी कुडाळ येथील प्रांत आणि तहसिल कार्यालयांना भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. दौऱ्याची सुरुवात प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
यानंतर श्री. खारगे यांनी तहसील कार्यालयातील विविध महसूल शाखांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी, अभिलेख व्यवस्थापन, ७/१२ दुरुस्ती प्रकरणे, नवीन अकृषिक सुधारणा, जमीन महसूल व शासकीय जमीन विषयक प्रकरणांचा त्यांनी सखोल आढावा घेतला. नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि परिणामकारक सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला.
     यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्री. खारगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत नागरिकांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. प्राप्त होणाऱ्या अर्ज व प्रकरणांचा तातडीने निपटारा करून नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांशीही त्यांनी थेट संवाद साधला. विविध शासकीय सेवांबाबत नागरिकांच्या अडचणी, सूचना व अपेक्षा जाणून घेत प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर दिला.
    त्यानंतर त्यांनी प्रांत कार्यालयाला भेट देऊन eQJ Court प्रणालीच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. न्यायालयीन कामकाज अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी कोणत्या सुधारणा करता येतील याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या. तसेच देवस्थान जमीन कायदा संमत झाल्यानंतर त्यासंदर्भातील मानक कार्यपद्धती (SOP) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी अधिकारी वर्गाला दिली.
     यानंतर श्री. खारगे यांनी भूमी अभिलेख कार्यालय, कुडाळ येथे भेट देऊन तेथील विविध कामकाजाची माहिती घेतली. महसूल प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर, सेवा वितरणाची गुणवत्ता आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धती याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही केले. श्री. खारगे यांनी माणगाव महसूल मंडळातील बेनगाव येथे भेट दिली. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाच्या माध्यमातून पारधी समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. या निर्णयामुळे समाजाच्या दळणवळणाचा महत्त्वाचा प्रश्न सुटला असून रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून प्रशासनाच्या कामाबाबत अभिप्राय जाणून घेतला. प्रशासनाच्या पुढाकारामुळे दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
  यानंतर अप्पर मुख्य सचिवांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, माणगाव तसेच मंडळ अधिकारी कार्यालय, माणगाव येथे भेट देऊन महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, माणगाव येथील सेतू केंद्राला भेट देऊन शासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध दाखला सेवांची माहिती घेतली. यावेळी नव्याने ऑनलाइन दाखला प्रणालीमध्ये Government Process Reengineering (GPR) अंतर्गत करण्यात आलेल्या सुधारणांचा त्यांनी आढावा घेतला. या सुधारणांमुळे नागरिकांना मिळणारी सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सेवा वितरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी श्री. खारगे यांनी माणगाव येथील श्री दत्त मंदिरालाही भेट दिली. मंदिराचा इतिहास, धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व याविषयी माहिती जाणून घेत त्यांनी स्थानिक वारसा जतन करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

error: Content is protected !!