ठळक घडामोडी

वाडी हुमरमळा येथे गोकृपा अमृतम प्रात्यक्षिक; सेंद्रिय शेतीचा संदेश!

रासायनिक खतांना पर्याय; शेतकऱ्यांना गोकृपा अमृतमची माहिती

कृषी विभागाचा पुढाकार; नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कुडाळ : प्रतिनिधी
       आजकाल बेसुमार होत असलेला खतांचा वापर शेतीमध्ये कमी करून, नैसर्गिक घटकांचा वापर करून सेंद्रिय व शाश्वत शेती यांना चालना देण्याच्या उद्देशाने कुडाळ तालुक्यातील वाडी हुमरमळा येथे कृषी विभागामार्फत गोकृपा अमृतम ह्या जिवाणू संवर्धकाचे प्रात्यक्षिक दाखवून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे दशपर्णी अर्क प्रात्यक्षिक देखील घेण्यात आले.
      सदर कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कुडाळ श्री. भास्कर चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली, कृषीसेवक श्रीम. स्नेहा सामंत तसेच कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे मृदा शास्त्रज्ञ श्री. विकास धामापूरकर यांच्या माध्यमातून शुक्रवारी यशस्वीरित्या पार पडला. ह्यावेळी हूमरमळा गावातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
       कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सततच्या रासायनिक खतांच्या वापराने जमिनीचा पोत खालावत चालला आहे. यावर उत्तम उपाय म्हणजे देशी गाईच्या पंचगव्यापासून तयार केलेले गोकृपा अमृतम कल्चर. यामध्ये सुमारे 40 पेक्षा जास्त मित्र जिवाणू असतात जे जमिनीची सुपीकता कमालीची वाढवतात. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. रासायनिक खतांवर होणारा अवाजवी खर्च कमी करून शेती मधील उत्पादन खर्च कमी करतात. यावेळी थेट प्रात्यक्षिकातून गोकृपा अमृतम बनविण्याची सोपी पद्धत सादर करण्यात आली. प्रत्यक्ष द्रावण तयार करण्याची कृती दाखविताना 200 लिटर पाण्यात 1 लिटर गोकृपा अमृतम कल्चर, 2 किलो सेंद्रिय गुळ, 2 लीटर देशी गाईच्या दुधापासून बनविलेले ताक हे सर्व घटक वापरून हे द्रावण 6-7 दिवसात कसे तयार होते, ह्याचे सोपे गणित शेतकऱ्यांना समजून सांगण्यात आले.
     तालुका कृषी अधिकारी यांच्या विशेष सूचनेनुसार वाडी हुमरमळा व पंचक्रोषीतील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा अवलंब करावा व मातीचे आरोग्य सुधारावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले. ह्या प्रत्यक्षिकासाठी गावातील प्रगतिशील शेतकरी व महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!