भटक्या कुत्र्यांच्या विळख्यातून बालकाचा थरारक बचाव
पालकांचा शोध सुरू; मालवण पोलिसांचे नागरिकांना आवाहन
मालवण : महेश कदम
मालवण येथील भरड परिसरात आज बुधवारी पहाटे एक धक्कादायक घटना समोर आली. सुमारे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आला.विशेष म्हणजे, पहाटेच्या अंधारात हा लहानगा काही भटक्या कुत्र्यांच्या विळख्यात सापडला होता. सुदैवाने, कुत्र्यांनी घेरलेले असतानाही त्याला कोणतीही दुखापत झाली नाही आणि तो सुखरूप वाचला. या घटनेमुळे संपूर्ण मालवण परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बालकाला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत बालकाची प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट झाले.
हा मुलगा नेमका कोणाचा आहे आणि तो भरड परिसरात कसा पोहोचला, याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून स्थानिक नागरिकांकडूनही माहिती संकलित केली जात आहे.
मालवण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या बालकाची ओळख पटत असल्यास किंवा त्याच्या पालकांबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून चिमुकला सुरक्षित असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.









