कारचे मोठे नुकसान; प्रवासी सुखरूप
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे कार व ट्रकची धडक बसून अपघात झाला आहे. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असेन सुदैवाने कारमधील प्रवासी सुखरूप आहेत. आज शनिवारी दुपारी १२:१५ वागण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
दोडामार्ग ते बांदा राज्य मार्गावरील कळणे येथील खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. टार्गेट पूर्ण करण्यासाठी हे ट्रकचालक वाहने वेगात चालवतात. याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रार करूनही त्याकडे कानाडोळा करण्यात आला आणि याचाच फटका शनिवारी दुपारच्या सुमारास एका कारचालकाला बसला. हा कारचालक कार घेऊन बांदा ते दोडामार्ग असा प्रवास करत होता. दरम्यान आडाळी येथील श्री माऊली मंदिराजवळील तीव्र वळणाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली.
अपघातानंतर मोठा जमाव जमा झाला. त्यांनी ट्रक चालकाची चांगलीच कान उघडणी करत त्याला फैलावर घेतले. तसेच तुम्ही खनिज युक्त मातीची वाहतूक करत असून टार्गेट पूर्ण करण्यासाठी वेगाने वाहन का चालवता? असा सवाल ट्रक चालकास विचारला. यावेळी ट्रकचालक निरुत्तर झाला. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारमधील सर्वजण सुखरूप आहेत.









