ठळक घडामोडी

पंचायत समितीच्या मासिक सभेत महसूल विभाग अधिकृतरित्या उपस्थित राहावा!

माणगाव पं.स.सदस्य योगेश धुरी यांची अप्पर सचिवांकडे मागणी

राज्याचे महसूल अप्पर सचिव विकास खारगे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कुडाळ : प्रतिनिधी
        पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध विभागांचे खातेप्रमुख नियमितपणे उपस्थित राहून लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांवर चर्चा करतात. मात्र महसूल विभाग अधिकृतरित्या या सभेत सहभागी होत नसल्याने महसूल विषयक अनेक प्रश्न प्रलंबित राहतात, अशी बाब कुडाळ पंचायत समितीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते तथा माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी शुक्रवारी राज्याचे महसूल अप्पर सचिव विकास खारगे यांच्या निदर्शनास आणून दिली.
        श्री.खारगे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, त्यांनी कुडाळ येथे विविध सरकारी आस्थापनांचा आढावा घेतला. यावेळी योगेश धुरी यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत महसूल विभागालाही अधिकृतरित्या उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली. महसूल विभाग उपस्थित राहिल्यास शेतकरी व नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी, तक्रारी तसेच सूचना थेट मांडता येतील व त्यावर तत्काळ चर्चा होऊन मार्ग काढता येईल, असे त्यांनी सांगितले.
    या मागणीची दखल घेत अप्पर सचिव श्री. खारगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या संदर्भात काय करता येईल याचा अभ्यास करून लवकरच योग्य निर्णयाबाबत माहिती देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्याची माहीती श्री. धुरी यांनी दिली.

error: Content is protected !!