माती परीक्षण ते गोकृपा अमृत; शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांचे प्रात्यक्षिक
शेतीशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महिला शेतकऱ्यांचीही उपस्थिती
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत महाराष्ट्र नैसर्गिक शेती मिशन २०२६-२७ अंतर्गत कुसबे येथे आज शनिवारी ‘शेतकऱ्यांची शेतीशाळा’ (भात पीक) प्रथम वर्ग उत्साहात पार पडला. या शेतीशाळेला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी उपकृषी अधिकारी श्रद्धा वाडेकर, कृषी सेवक निखिल ढोकणे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया खरवडे यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण, बीज प्रक्रिया, बीज उगवण क्षमता चाचणी, दशपर्णी अर्क आणि गोकृपा अमृत याबाबत सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिके दाखविली.
कार्यक्रमाची सुरुवात आयसीएम टाळीने करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांचे गट करून विविध उपक्रम राबविण्यात आले. मातीचा नमुना योग्य पद्धतीने कसा घ्यावा, बीजप्रक्रिया व उगवण क्षमता चाचणीचे महत्त्व, तसेच सेंद्रिय शेतीसाठी गोकृपा अमृत आणि कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी ‘संवाद सेतू’ कार्यक्रम आणि सांघिक खेळाचेही आयोजन करण्यात आले. शेवटी अल्पोपहारानंतर शेतकरी चैत्राली जाधव यांनी आभार मानले. या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी महिला शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









