ठळक घडामोडी

देवगड – कोटाकामते येथे पोलिसांची धडक कारवाई!

२३ गांजाची झाडे जप्त; परिसरात खळबळ

देवगड : प्रतिनिधी
     सिंधुदुर्ग पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधातील मोहिमेअंतर्गत देवगड तालुक्यात मोठी कारवाई केली असून कोटकामते आडीवरेवाडी येथील एका घराच्या परिसरात गांजा लागवड केलेली २३ झाडे जप्त केली आहे.पोलिसांनी संशयित आरोपीविरूध्द एन्डीपीएस् कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २९ मे रोजी केली. जिल्ह्यात गांजाच्या उभ्या पीकाच्या लागवडीवरील ही पहिलीच कारवाई असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.
    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पोलिसांना गोपनीय सुत्रांकडून कोटकामते आडीवरेवाडी येथील एका इसमाने आपल्या घराच्या परिसरात गांजी पिकाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिस अधिक्षक डॉ.मोहन दहिकर, अप्पर पोलिस अधिक्षक नयोमी साटम व उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक श्याम बुवा यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने छापा टाकला.यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुप्रिया बंगडे,  पोलिस हवालदार महेंद्र महाडिक, गणपती गावडे, पो.कॉ.प्रसाद आचरेकर, रवींद्र महाले हे पथकात सहभागी होते.या पथकाने कार्यवाहीसाठी दोन शासकीय पंच, कृषी अधिकारी, छायाचित्रकार, वजनकाटाधारक, फॉरेन्सीक पथक यांना घटनास्थळी पाचारण करून संशयितांनी लागवड केलेली गांजाची रोपे यांचा पंचनामा केला.४९ हजार रूपये किमतीचे, २ किलो ४५० ग्रॅम वजनाचे ताजे ओलसर गडद हिरव्या रंगाचे, उग्र वासाची, ३ ते ५ फुट उंचीची २३ गांजाची झाडे जप्त केली.संशयिताने आपल्या राहत्या घराच्या परिसरामध्ये गांजा पिकाची लागवड केल्याचे कबूल केले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.याबाबत पोलिस हवालदार महेंद्र महाडिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अवैधरित्या गांजा लागवड केल्याप्रकरणी ओंकार कोतेकर याच्याविरूध्द एन्डीपीएस् अ‍ॅक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब),दोन(ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

error: Content is protected !!