शिवसेना (उबाठा)-युवासेनेचा ‘आमची हाक, तुमचा प्रतिसाद’ वृक्षलागवड उपक्रम
१३ जून रोजी अभियानाचा शुभारंभ; नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील भूजल पातळी गेल्या काही वर्षांत सातत्याने खालावत असून ही बाब भविष्यासाठी चिंताजनक आहे. पूर्वी ४० फुटांवर मिळणारे पाणी आता ४५ ते ५० फुटांपर्यंत खाली गेले आहे. शहराचा वेगाने विकास होत असला तरी वृक्षतोड होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढविण्यासाठी शहरातील प्रत्येक घराच्या अंगणात वृक्षलागवड करण्याचा संकल्प शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमची हाक, तुमचा प्रतिसाद’ हा अभिनव वृक्षलागवड उपक्रम शहरात राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत ५ हजार झाडांची लागवड शिवसैनिक करणार आहेत, अशी माहिती ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ येथील ठाकरे शिवसेना शाखेत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत नगरसेवक श्री.शिरसाट बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, अमित राणे, गुरू गडकर, गोट्या चव्हाण, नागेश जळवी आदी उपस्थित होते.
मंदार शिरसाट म्हणाले की, कुडाळ शहरातून बेल, आवळा, गेवगा, बहावा, चिंच यांसारखी अनेक पारंपरिक झाडे नामशेष होत चालली आहेत. वृक्षतोडीमुळे भूजल पातळीवर विपरीत परिणाम होत असून पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमची हाक, तुमचा प्रतिसाद’ हा अभिनव वृक्षलागवड उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना एक क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याद्वारे नागरिकांना त्यांच्या पसंतीचे झाड मागविता येणार आहे. संबंधित नागरिकांच्या घराच्या अंगणात शिवसैनिक प्रत्यक्ष जाऊन ते झाड लावून देणार आहेत. कुडाळ शहरातील प्रत्येक घराच्या अंगणात किमान एक झाड लावण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“आपल्या पूर्वजांनी पर्यावरणाचे जतन केले म्हणूनच आज आपण चांगले आणि स्वच्छंद जीवन जगत आहोत. मात्र आपण आज पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत, तर त्याचा विपरीत परिणाम पुढील पिढ्यांवर होणार आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी हे आश्वासक पाऊल उचलण्यात येत आहे,” असेही श्री.शिरसाट यांनी यावेळी सांगितले.
शहरातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे सांगताना श्री. शिरसाट म्हणाले की, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन कुडाळ शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सर्व शासकीय इमारतींमध्येही ही व्यवस्था अनिवार्य करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. नगरसेवक म्हणून आपण नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन तसेच सर्वसाधारण सभेत शहरात नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था पूर्ण केल्याशिवाय ऑक्युपेशन सर्टिफिकेट देऊ नये, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्यात यावे, तसेच ही व्यवस्था उभारणाऱ्या आस्थापनांना शासनाच्या धोरणानुसार घरपट्टीमध्ये ५ ते १० टक्के सवलत देण्याचा प्रस्तावही नगरपंचायत सभेत मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहराचा विकास होत असताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची खंत व्यक्त करताना श्री.शिरसाट यांनी सांगितले की, शहरातील पडीक जागा, शासकीय कार्यालयांचे परिसर तसेच उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १३ जून रोजी या अभियानाचा शुभारंभ शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यंदा कुडाळ शहरात तब्बल पाच हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार ठाकरे शिवसेनेने केला असून पर्यावरण संवर्धनाच्या या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मंदार शिरसाट यांनी यावेळी केले.









