जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरेंचे आवाहन
आवळेगाव येथे कृषी विभागामार्फत एल निनो प्रभाव व शाश्वत शेती तंत्रज्ञान जनजागृती

कुडाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील स्थानिक पातळीवर एल निनो प्रभावाबाबत जनजागृती आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आज बुधवारी आवळेगाव येथे एका विशेष शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी शेतकर्यांना यंदाचा खरीप हंगाम एल निनो च्या सावटाखाली असल्याने कमी दिवसाची भात बियाणे वापरावे, तसेच पुरेसा पाऊस पडल्याशिवाय भात पेरणी करू नये आणि कृषि विभाग सल्ला त्याप्रमाणे आपली दिशा ठरवावी, असे आवाहन केले.
तसेच तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले यांनी गोकृपा अमृत कल्चर या सेंद्रिय द्रावण चा वापर आपल्या शेतीत करावा आणि जास्तीत जास्त शेतकरी यांनी आपली वाटचाल आपली संपूर्ण शेती सेंद्रिय होण्याकडे लक्ष केंद्रित करून शेती करावी. आणि आपले संपूर्ण गाव गोकृपा अमृत कल्चर या सेंद्रिय द्रावण चा वापरा खाली आणावे. तसेच गावच्या सरपंच पूर्वा सावंत आणि उपसरपंच विवेक कुपेरकर यांच्या उपस्थितीत गोकृपा अमृत आणि लाल घाटीपंकज वापरून सहाय्यक कृषि अधिकारी प्रिया खरवडे यांनी भात बीजप्रक्रिया प्रात्याक्षिक यशस्वीरीत्या दाखवण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाईकनवरे यांचा, ग्रा.पं.सदस्य शुभदा सावंत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात नाईकनवरे मॅडम यांच्या हस्ते गावातील प्रगतशील शेतकरी यांना ४० लीटर गोकृपा अमृतचे वाटप करण्यात आले, ज्याच्या साहाय्याने पुढील आठवड्यात या गावात तब्बल ८००० लीटर सेंद्रिय जीवाणू संवर्धन विद्राव तयार होणार आहे. याच सोहळ्यात ‘ॲग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’चे प्रतिनिधी श्री. ऋतुराज सावंत यांच्या मार्फत उपस्थित शेतकऱ्यांना स्थानिक भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आवाहन केले की, “सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्थानिक भात बियाण्यांची लागवड करावी. बाजारातील महागड्या बियाण्यांवर अवलंबून न राहता स्वतःचे पौष्टिक आणि दर्जेदार बियाणे स्वतःच तयार करावे, जेणेकरून शेती स्वावलंबी होईल.”
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी सगरे, उप कृषी अधिकारी श्रद्धा वाडेकर, सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया खरवडे आणि कृषी सेवक निखिल ढोकणे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच गावच्या सरपंच पूर्वा सावंत आणि उपसरपंच विवेक कुपेरकर यांच्या विशेष सहकार्यातून हा संपूर्ण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.










