शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांचे आव्हान
कुडाळ : प्रतिनिधी
उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक हे गेल्या काही दिवसांपासून केवळ राजकीय नौटंकी करत असून कुडाळमधील त्यांचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याची टीका शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी केली. तसेच कणकवली शहर विकास आघाडीच्या विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैभव नाईक यांनी हिंमत असेल तर आपल्या बंधूंचा राजीनामा देऊन दाखवावा, असे थेट आव्हानही त्यांनी दिले.
कुडाळ येथील शिवसेना कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर बोलत होते. यावेळी कुडाळ तालुका चिटणीस सुशील कदम व राजवीर पाटील आदी उपस्थित होते.
श्री.करलकर म्हणाले, बुधवारच्या कुडाळच्या आठवडा बाजाराच्या दिवशी आचारसंहिता लागू असतानाही १० ते १५ लोकांना घेऊन वैभव नाईक यांनी आंदोलन केले. आंदोलनावेळी गॉगल लावून येण्याची त्यांची पद्धत पुण्यातील एखाद्या टवाळकी गँगसारखी वाटत होती. कोथिंबीर ७० रुपये जुडी झाली म्हणून ओरडणाऱ्या नाईकांनी तीच कोथिंबीर एक रुपयाला विकली जात असताना आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना आवाज का उठवला नाही? नाईक हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत की विरोधात, याचा खुलासा त्यांनी करावा, असे आव्हान त्यांनी दिले.
कणकवली शहर विकास आघाडीच्या यशाचे श्रेय पूर्णपणे शिवसेना नेते, आमदार निलेश राणे आणि माजी आमदार राजन तेली यांना असल्याचे करलकर यांनी स्पष्ट केले. राजन तेली यांच्या प्रयत्नांमुळे आघाडी आकारास आली, तर निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी घेतलेल्या बैठकींमुळे आघाडीचे नगरसेवक निवडून आले. निवडणुकीच्या काळात वैभव नाईक हे कणकवली सोडून मालवणमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यामुळे या विजयात त्यांचा काडीचाही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला.
“माझ्या बंधूंना निवडून आणण्यात निलेश राणे यांचा वाटा असेल तर मी त्यांचा राजीनामा द्यायला लावेन,” या वैभव नाईक यांच्या विधानाचाही करलकर यांनी निषेध केला. “मी नाईकांना आव्हान देतो की, त्यांनी आपल्या बंधूंचा राजीनामा देऊन दाखवावा. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,” असे करलकर म्हणाले.
वैभव नाईक यांच्या जिल्हाप्रमुख पदावर झालेल्या नियुक्तीवरही त्यांनी टीका केली. पक्षाने त्यांचे आधीच डिमोशन केले असून आमदार असताना आता ते साध्या जिल्हाप्रमुख पदावर आले आहेत. त्यांच्या पक्षाची अवस्था अशी झाली आहे की, राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत यांसारखे मोठे नेते त्यांना सोडून गेले आहेत, असा दावा त्यांनी केला. जिल्हा परिषद निवडणुकीत पाच विभागांत निरीक्षक म्हणून काम केल्याचा उल्लेख करताना करलकर यांनी वैभव नाईक यांच्या कार्यकाळावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या दहा वर्षांच्या कालावधीत नेमका कोणता विकास झाला, रस्त्यांची झालेली दुरवस्था सर्वसामान्य जनतेने अनुभवली आहे, असे ते म्हणाले.
आ. निलेश राणे हे राज्यातील २५० हून अधिक आमदारांमधील सर्वोत्तम पाच आमदारांमध्ये गणले जातात. केवळ त्यांच्यावर टीका करून मोठे होण्याचा प्रयत्न वैभव नाईक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. यापुढे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी आणि आमदारांवर केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रत्येक टीकेला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही श्री. करलकर यांनी यावेळी दिला.









