ठळक घडामोडी

कुडाळ महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम; प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी!

‘शिका आणि कमवा’चा नवा अध्याय; ऑलटीम कंपनीसोबत महाविद्यालयाचा ऐतिहासिक करार

शिक्षणासोबत मानधनही! कुडाळमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअरचे नवे दालन खुले

कुडाळ : प्रतिनिधी
        उच्च शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी आणि शिक्षणासोबत आर्थिकदृष्ट्याही सक्षम होता यावे, या उद्देशाने कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. महाविद्यालय आणि ऑलटीम कंपनी यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला असून, यामुळे प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘शिका आणि कमवा’चा नवा मार्ग खुला झाला आहे.
        महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित ‘दीक्षारंभ’ स्वागत सोहळ्यात या कराराची घोषणा करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण सुरू असतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव, प्रशिक्षण आणि मानधनासह रोजगाराची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, अशा स्वरूपाचा रोजगाराभिमुख उपक्रम राबविणारे संत राऊळ महाराज महाविद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
         महाविद्यालयाच्या एकनाथ ठाकूर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कमशिप्र मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद शिरसाट, ऑलटीम कंपनीचे चेअरमन बिजल मेहता, सरकार्यवाह अनंत वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस, प्रमोद पेडणेकर, अविनाश तळेकर आणि प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     यावेळी प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे आणि ऑलटीम कंपनीचे चेअरमन बिजल मेहता यांनी करारपत्रावर स्वाक्षऱ्या करून विद्यार्थ्यांच्या करिअरच्या नव्या पर्वाची औपचारिक सुरुवात केली. प्राचार्य डॉ. सुरवसे यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२३ अंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि जॉब ट्रेनिंग अनिवार्य होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान असताना ऑलटीम कंपनीच्या सहकार्यामुळे ते शक्य झाले आहे. महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या विशेष तंत्र प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थी फायनान्स, कंटेंट रायटिंग, कंटेंट क्रिएशन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यांसारख्या क्षेत्रांत प्रत्यक्ष काम करू शकतील. त्यांना या कामासाठी मानधनही मिळणार असून पदवी पूर्ण झाल्यानंतर कंपनीत कायमस्वरूपी करिअरची संधीही उपलब्ध राहणार आहे.
      अध्यक्षीय भाषणात अरविंद शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन केले. “आजपासून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ घेत उज्ज्वल करिअर घडवा,” असे ते म्हणाले. ऑलटीम कंपनीचे चेअरमन बिजल मेहता तसेच सीईओ सिद्धार्थ दास, सीटीओ सूर्या कट्टकम, व्ही.पी. ग्रँड डिसोजा आणि प्रग्या राऊत यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

error: Content is protected !!