शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा कुडाळ एमआयडीसी प्रशासनाला इशारा
चार दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा एमआयडीसी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय ते एमआयडीसी नाका पर्यंत झालेल्या चौपदरीकरण रस्त्याला दिशादर्शक फलक तातडीने लावण्यात यावेत. या रस्त्यावर येत्या चार दिवसात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसवण्यात यावेत, अन्यथा एमआयडीसी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी एमआयडीसी प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.
श्री.गावडे यांनी आज शुक्रवारी एमआयडीसीच्या उप अभियंत्यांना याबाबतचे निवेदन दिले. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, सदरच्या रस्त्याचे काम अलिकडेच झाले आहे. सदर ठेकेदाराने रिफ्लेक्टर व दिशादर्शक फलक लावणे गरजेचे होते. आपल्याला या अगोदर या रस्त्यावर रिफ्लेक्टर व दिशादर्शक फलक लावण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र आपल्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. काही दिवसांमध्ये शाळा सुरू होणार आहेत त्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळण्याची शक्यता आहे व अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यावर दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसवण्यात यावेत हे चार दिवसांमध्ये काम झाले नाही तर आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी एमआयडीसी प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.









