कणकवली तालुक्यातील नडगिवे गावातील घटना
संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद; कणकवली पोलीसांकडून वेगाने तपास सुरू
कणकवली : प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नडगिवे गावातील धुरीभाटले या वाडीत अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल सहा बंद घरे फोडून चोरी केल्याची आज घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. संशयित सहा जणांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पहाटे सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास ही घरफोडी झाल्याचे स्पष्ट होत आहे. चोरट्यांनी घरांची कुलपे व कडीकोयंडे तोडून आत प्रवेश करत कपाटे फोडली. घरमालक बाहेरगावी असल्याने चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. या घटनेमुळे नडगिवे व खारेपाटण परिसरात घबराट पसरली असून चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









